नवी दिल्ली – जगभरात कॅन्सरच्या (cancer) केसेसमध्ये वेगाने वाढ होत आहे. या आजारामुळे 2020 साली सुमारे 1 कोटी नागरिकांचा मृत्यू झाला. जेव्हा शरीरात असलेल्या पेशी एखाद्या भागात असामान्य पद्धतीने वाढू लागतात, तेव्हा ट्यूमर विकसित होतो. ज्याचे कर्करोगात रुपांतर होते. कर्करोगाचेही अनेक प्रकार असतात, त्यापैकीच एक म्हणजे स्वादुपिंडाचा कर्करोग (pancreatic cancer) हा आपल्या शरीरातील स्वादुपिंडामध्ये विकसित होतो. या कर्करोगाची लक्षणेही (symptoms) थोडी वेगळी असतात, ज्यामुळे हा आजार सहज ओळखणे शक्य होत नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये पायांमध्ये वेदना होऊन सूज येऊ शकते. मात्र बरेचसे लोक याकडे इतर समस्या समजून दुर्लक्ष करतात. कोणाला ही लक्षणे जाणवल्यास त्यांनी कॅन्सरची चाचणी करून घेतली पाहिजे. त्याशिवाय लघवीचा रंग अति पिवळा असणे अथवा त्वचेला खाज सुटणे हेही स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
हा कॅन्सर अतिशय धोकादायक असतो असं डॉक्टर सांगतात. यामध्ये लोकांच्या जगण्याचा दर फक्त ६ टक्के आहे. कारण बऱ्याचशा लोकांना या कॅन्सरच्या लक्षणांची माहिती नसते. यामुळे बहुतांश प्रकरणे ॲडव्हान्स स्टेजमध्ये समोर येतात, अशावेळी त्यावर उपचार करणं हे मोठं आव्हान ठरतं.
स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्ये ही लक्षणे दिसतात
– अचानक वजन कमी होणे
– खूप थकायला होणे
– भूक कमी लागणे
– वारंवार काविळ होणे.
हा आजार असणाऱ्या लोकांना असतो अधिक धोका
ज्या लोकांना लठ्ठपणा आणि मधुमेहाा आजार आहे, त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो, असे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अनुराग कुमार यांनी स्पष्ट केले. बऱ्याच संशोधनांमधून असं दिसून आलं की टाइप -2 मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये या कर्करोगाचा धोका एक वर्षानंतर वाढतो. त्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना पायात वेदना होणे तसेच सूज येणे ही लक्षणे दिसल्यास तातडीने कॅन्सरची तपासणी करून घ्यावी. तसेच चांगली जीवनशैली राखण्याचा प्रयत्न करा. पोषक आहार घ्यावा. तसेच नियमितपणे व्यायाम करावा. असे केल्याने लठ्ठपणा आणि मधुमेह दोन्ही नियंत्रणात राहतील.
त्याशिवाय जे लोक अधिक प्रमाणात धूम्रपान करतात, त्यांनाही स्वादुपिंडाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. द लॅन्सेट मेडिकल जर्नलच्या अभ्यासानुसार चेन स्मोकर्समध्ये कॅन्सरचे प्रमाण सामान्य लोकांच्या तुलनेत 20 टक्के जास्त असल्याचे दिसून आले आहे. तसेच स्वादुपिंडाच्या कर्करोगाची प्रकरणे 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत धूम्रपान सोडणे गरजेचे आहे.
(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)