आजकालच्या डिजीटल जगात टिकाव धरण्यासाठी स्मार्टफोनचा (smartphone)वापर अनिवार्य आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच स्मार्टफोन वापराची सवय लागली आहे. स्मार्टफोन हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. काहीजण त्याचा वापर अगदी कामापुरता, गरजेपुरताच करतात, मात्र काही व्यक्ती अगदी त्याच्या आहारी गेल्या आहेत. आधी केवळ प्रोफेशनल लाईफपुरता मर्यादित असलेला स्मार्टफोन आता खासगी आयुष्यावरही प्रभाव टाकत आहे. कॅनडामध्ये नुकताच या संदर्भात एक संशोधन (research)करण्यात आले असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, स्मार्टफोन आणि इतर डिजीटल डिव्हाईसचा वापर करणाऱ्या पालकांचे (parents) आपल्या मुलांशी वागणे बदलले आहे. ते त्यांच्यावर चिडचिड करू लागले आहेत.
5 ते 18 वयोगटातील दोन मुलं असणाऱ्या 549 पालकांवर कॅनडामध्ये हा रिसर्च करण्यात आला. या सर्व रिसर्चचे निष्कर्ष अतिशय धक्कादायक होते. त्या निष्कर्षांनुसार, जे पालक दिवससभरात 4 तास किंवा त्याहून अधिक काळ मोबाईल अथवा इतर डिजीटल डिव्हाईसचा वापर करतात, ते आपल्या मुलांवर चिडचिड करतात. ते मुलांना सतत रागावत राहतात, असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
या रिसर्चनुसार, मोबाईल अथवा इतर डिजीटल डिव्हाईसचा वापर करणाऱ्या पालकांपैकी 75 टक्के व्यक्तींना डिप्रेशनचा त्रास होता. डिजीटल डिव्हाईसचा वापर करणाऱ्या पालकांची मुलांसंदर्भातील वागणूक अतिशय नकारात्मक होती.
डिजीटल डिव्हाईसमुळे स्क्रीनचा वाढलेला वेळ आणि व्यवहारातील चिडचिडेपणा यांचा परस्पर संबंध आढळला आहे. या रिसर्चनुसार, कुटुंबातील सदस्यांमधील संभाषण कमी झाले, त्याचा परिणाम असा झाला की आई-वडिलांमध्ये वाईट सवयी निर्माण होऊ लागल्या.
मात्र, कॅनडामध्ये करण्यात आलेल्या या संशोधनातून असेही समोर आले आहे की, जे पालक दिवसातून एक किंवा दोन तास डिजीटल उपकरणांवर घालवतात, त्यांचे मुलांशी वागणे अधिक अधिक सकारात्मक असते.