नवी दिल्ली – दिवाळीच्या दिवशी देशात राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये फटाके (firecrackers) फोडण्यात आले. काही ठिकाणी फटाक्यांवर बंदी असूनही फटाके लावण्यात आले असून प्रदूषणाचा (pollution) स्तर फारच वाढला आहे. दिवाळीनिमित्त राजधानीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली आणि स्विस संस्थेच्या IQAir नुसार सोमवारी ते जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले. या प्रदूषणाचा आपले आरोग्य आणि त्वचा (effect on skin) या दोन्हींवर परिणाम होतो. वायू प्रदूषणामुळे त्वचेवर घाण जमा होऊन पिंपल्स येऊ शकतात.
रिपोर्ट्सनुसार, वायू प्रदूषणामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोच, पण त्यामुळे आपण अकाली म्हातारेही होऊ शकतो. चुकीचा आहार, ताणतणाव आणि त्वचेची नीट निगा न राखणे यासोबतच वायू प्रदूषणामुळेही त्वचेची सर्वाधिक हानी होते. हवेमध्ये काही घटक असतात, ज्यांना पार्टिक्युलेट मॅटर म्हणून ओळखले जाते, त्यातील काही घटक आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण ते त्वचेसाठी खूप नुकसानदायक असतात. वायू प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी काही टिप्सचा अवलंब केल्यास त्वचेची अधिक चांगली काळजी घेता येऊ शकते.
अधिक एसपीएफ असलेले सनस्क्रीन –
हवेत असलेल्या प्रदूषणांच्या कणांमुळे आपली त्वचा काळसर आणि निर्जीव होते. अशी वेळी त्वचेवर अधिक एसपीएफ असलेले सनस्क्रीन लावावे. त्यामध्ये असलेले घटक हे त्वचेला घाणीपासून वाचवतात, तसेच ती बरी करण्यासही मदत करतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या काळात जेल बेस्ट सनब्लॉक क्रीमचा वापरही उत्तम ठरू शकतो.
गुलाब पाणी –
त्वचेला एखादे लोश लावण्यापूर्वी त्वचा हायड्रेट करा. त्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याची मदत घेऊ शकता. त्यासाठी एक कापसाचा बोळा घेऊन तो गुलाब पाण्यात भिजवावा आणि चेहऱ्यावर लावावा. या उपायामुळे तुमच्या त्वचेचे प्रदूषणापासून संरक्षण होते. तसेच रात्री झोपण्यापूर्वीही चेहरा आणि हात गुलाब पाण्याने जरूर स्वच्छ करावेत. असे केल्याने त्वचेवरील घाण साफ होईल.
कॅलामाइन लोशन –
हवेमध्ये असलेल्या विषारी कणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी कॅलेमाइन असलेले लोशन लावा. याचे घटक त्वचेला वायू प्रदूषणापासून सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. वायू प्रदूषणाचा वाढता प्रभाव लक्षात घेता हा उपाय तुम्ही दिवसभरातून दोनदा जरूर करावा.
फेसपॅक –
चेहरा धुणे आणि सनस्क्रीन वापरणे, याशिवायही त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी फेस पॅकचा वापर जरूर करावा. त्यासाठी कोरफड जेल किंवा इतर पदार्थांचा उपयोग करून फेस पॅक किंवा फेस मास्क बनवू शकता. ते चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर साचलेले विषारी कण सहज दूर होतील.