डोळे लाल होणे (Redness in Eyes) ही एक सर्वसाधारण समस्या आहे. ही समस्या अनेकदा ऍलर्जीमुळे (Allergy) सुद्धा आपल्याला होऊ शकते. डोळे लाल होण्यामागे विविध कारणे देखील असतात. जर डोळ्यांमध्ये ग्लूकोमा किंवा ट्यूमर झाला असेल तरी आपले डोळे लाल होतात. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये डोळ्यांची योग्य ती स्वच्छता ठेवून डोळे लाल होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवता येते परंतु जर तुमच्या डोळ्यातील पांढरा भाग जास्त लाल झाला असेल व हा लालसरपणा दिवसेंदिवस वाढतच असेल तर अशावेळी काळजी करणे गरजेचे आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये लगेचच डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटायला हवं. आपले डोळे वारंवार लाल होण्यामागे डोळ्यांच्या नसांमधील रक्ताची कमतरता सुद्धा कारणीभूत ठरू शकते. ही समस्या झाल्यावर आपल्या डोळ्यातील जो पांढरा भाग असतो तेथे असणाऱ्या नसा लाल होऊन जातात व डोळयांच्या नसांमधील रक्त प्रवाह सुरळीत न झाल्यामुळे नसांना सूज येते, अशावेळी डोळ्यांमध्ये बाहेरील एखादा पदार्थ व काही धुळीचे कण शिरल्यास, एखादे इन्फेक्शन ( Infection) झाल्यास डोळे लाल होऊन जातात. याशिवाय डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळे आग मारणे, खाज येणे, ड्रायनेस, डोळ्यांत वेदना जाणवणे यासारख्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊया, या सगळ्या समस्या बद्दल..
ऍलर्जी , डोळ्यांचा थकवा , वायू प्रदूषण, धूळ, केमिकल किंवा सूर्याच्या हानिकारक प्रकाशामुळे सुद्धा अनेकदा जास्त एक्सपोझर मुळे डोळे आग मारतात. जास्त वेळ कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे, डोळ्यांना इन्फेक्शन होणे, डोळ्यांना एखादी जखम झाली असेल , डोळ्याची सर्जरी, कॉर्नियल अल्सर, या काही समस्या डोळे लाल होणे यामागे कारणीभूत ठरू शकतात.
– जर तुमच्या डोळ्यातील लालसरपणा हा एक आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक दिवस राहणे
– डोळ्यांवर अतिरिक्त प्रकाश पडल्यास वेदना जाणवणे
– एक किंवा दोन्ही डोळ्यांना स्पष्ट न दिसत नसेल
– डोळ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वेदना जाणवणे
यासारख्या समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा.
– जास्त वेळ कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नका. कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करण्यापूर्वी लेन्स पूर्णपणे स्वच्छ करायला पाहिजे.
– आपल्या डोळ्यांना केमिकल किंवा धोकादायक पदार्थांपासून वाचवण्याचा प्रयत्न करा.
– आपल्या डोळ्यांमध्ये कोणताही ड्रॉप डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात टाकू नका.
– सूर्याच्या धोकादायक किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करा.
– जर एखाद्या व्यक्तीला वारंवार डोळे लाल होण्याची समस्या उद्भवत असेल तर आपल्या हातांची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. वारंवार डोळ्यांना हात लावू नये. हात स्वच्छ साबणाने धुतल्यानंतर डोळ्यांना स्पर्श करावा.
– जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलेर्जी असेल तर अशा वेळीसुद्धा डोळे लाल होऊ शकतात. डॉक्टरांना भेटून योग्य तो औषधोपचार करावा.
डोळे लाल होण्याची समस्या वारंवार सतावत असेल तर अशावेळी डॉक्टरांना भेट देऊन डोळ्यांची आवश्यक ती चाचणी करा. जर तुमचे डोळे एखाद्या ऍलर्जीमुळे लाल होत असेल तर अशा वेळी डॉक्टर तुम्हाला आवश्यक ती औषधे देतील. जर डोळ्यांना बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाले असेल तर डॉक्टर तुम्हाला एंटीबायोटिक्स लिहून ती सेवन करायला सांगतील. जर डोळ्यांमध्ये ग्लुकोमा किंवा ट्युमर झाला असेल तर काही महिने डोळ्यांची ट्रीटमेंट करावी लागते म्हणूनच जर तुमचे सुद्धा डोळे वारंवार लाल होत असतील आणि ही समस्या खूप दिवसापासून असेल तर या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करायला हवा.
टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
इतर बातम्या: