नवी दिल्ली : धूम्रपानाची (Smoking) सवय ही केवळ आरोग्यासाठी नव्हे तर आपल्या त्वचेसाठीही (bad effect on health and skin) धोकादायक ठरू शकते. सिगरेटचे अतिसेवन केल्याने त्वचेच्या रंगावरही परिणाम होऊ शकतो. सिगरेटमध्ये अशी अनेक रसायने असतात, ज्यामुळे त्वचेवर वेळेआधी सुरकुत्या पडणे आणि कर्करोग (cancer) यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. धूम्रपानामुळे वाढत्या वयानुसार त्वचा पिवळी आणि ओठ काळे पडू लागतात. जास्त प्रमाणात धूम्रपान केल्याने हृदयाचे आरोग्य आणि फुप्फुसांवरही परिणाम होतो.
आजकाल फॅशन आणि स्टाइलमुळे तरुण धूम्रपानाला प्राधान्य देताना दिसतात, मात्र हे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कोणत्याही प्रकारचे धूम्रपान केले तरी ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. धूम्रपानाचे शरीरावर काय वाईट परिणाम होतात, जाणून घेऊया.
व्हेरीवेल माइंडनुसार, सिगारेटमध्ये असणाऱ्या रसायनांमुळे त्वचेचे कोलेजन आणि इलेस्टिनचे नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचा खरखरीत आणि अकाली सुरकुतलेली होऊ शकते. यामुळे धूम्रपान करणापी व्यक्ती वेळेआधीच म्हातारी दिसू लागते. त्यामुळे डोळ्यांवर, ओठांवर आणि कपाळावर सुरकुत्या उमटतात.
जे लोक जास्त धूम्रपान करतात, त्यांच्या त्वचेची लवचिकता कमी होते आणि त्वचा कडक होते. तसेच धूम्रपान केल्याने शरीरातील व्हिटॅमिन-ए कमी होते.
धूम्रपानामुळे व्हॅस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन होऊ शकते ज्यामुळे रक्ताभिसरण कमी होतो. शरीरातील रक्ताभिसरण कमी झाल्याने कोणतीही इजा बरी होणे किंवा जखम भरणे कठीण होते. जे लोक धूम्रपान करतात, त्यांना झालेली बारीकशी इजा किंवा जखम भरण्यासही अधिक वेळ लागतो.
यामुळे शरीरावरील किरकोळ जखमांच्या खुणा देखील वाढू शकतात. धूम्रपान केल्याने कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशनमध्ये देखील अडथळा येऊ शकतो.
सोरायसिसमध्ये, त्वचेला खाज सुटते आणि त्वचेवर खवले तयार होऊ लागतात. यामध्ये त्वचा लाल किंवा जांभळ्या रंगाची दिसू लागते. अशा परिस्थितीत, धूम्रपान केल्याने सोरायसिसला अधिक चालना मिळू शकते. बऱ्याचा अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की धूम्रपान केल्यामुळे सोरायसिसचा धोका अनेक पटींनी वाढतो.
सिगरेटमधील निकोटीनमुळे त्वचेला संसर्ग होतो व त्यामुळे त्वचेवर सूज आणि लालसरपणा येतो. हा प्रकार कधीकधी इतका वाढतो की, हाता- पायांवर वेदनादायक फोड येतात.