मुंबई : उच्च रक्तदाब (High blood pressure) या समस्येने बरेच लोक त्रस्त आहेत. उच्च रक्तदाबाची समस्या जगभरात आहे. ही समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तदाब नियमितपणे तपासायला हवा. उच्च रक्तदाबाची समस्या कुटुंबातच असेल, तर अगोदरच जागरूक राहणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्याने औषधोपचार सुरू करा. हे औषध स्वतः घेणे कधीही थांबवू नका किंवा ते स्वतः खरेदी करू नका. शिवाय आपण आहार व्यवस्थित घेतला तर आपली उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते. बरेच लोक रक्तदाबाची समस्या (Problem) सुरू झाल्यास फक्त औषध घेण्यावर भर देतात. मात्र, तसे न करता आपण आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जेणेकरून उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
तुम्हाला दररोज व्यायाम करावा लागेल. दररोज 50 मिनिटे व्यायाम केल्याने रक्तदाब व्यवस्थित होण्यास मदत होते. पण जर तुम्ही व्यायाम बंद केला तर तुमचा रक्तदाब वाढेल. म्हणून व्यायाम करत राहा, मग ते पोहणे असो, सायकलिंग असो किंवा इतर कोणताही व्यायाम असो.
कडधान्य, फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त दूध खाल्ल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. खाण्याच्या सवयी बदलणे सोपे नाही. पण तुम्ही काय खात आहात, कसे खात आहात, कधी खात आहात याचे निरीक्षण करावे लागेल. आहारात पोटॅशियम वाढवण्याचा प्रयत्न करा. यामुळे सोडियम नियंत्रणात राहील.
उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील सोडियमचे प्रमाण आहे. म्हणून तुमच्या रोजच्या आहारात सोडियम कमी खा. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहील. प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा. या पदार्थांमध्ये सर्वात जास्त सोडियम असते. शक्यतो घरचे ताजे अन्न खाण्याचाच प्रयत्न करा.