मुंबई : भारतातील (India) जवळ जवळ 1 कोटी रुग्णसंख्या असलेला हार्ट फेल्युअर हा आजार हृदयाशी संबंधित इतर सर्व आजारांपैकी हॉस्पिटलमध्ये वारंवार दाखल होण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरणारा आजार आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसमोरचा एक मोठा आजार असलेला हार्ट फेल्युअर अर्थात हृदय निकामी होत जाण्याचा आजार बरेचदा दुर्लक्षित राहून जातो आणि त्याला सरसकट हार्ट अटॅक (Heart attack) मानले जाते. जनजागृतीमुळे हार्ट फेल्युअरची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास कशाप्रकारे मदत होऊ शकते हे तज्ज्ञांनी (Expert) वारंवार सांगितले आहे. जनजागृतीमुळे लोक या आजारातील धोक्याचे घटक आणि लक्षणे लवकरात लवकर ओळखू शकतील आणि त्यानंतर हार्ट फेल्युअरचे परिणामकारक व्यवस्थापन व्हावे. यासाठी वेळच्या वेळी निदान करून घेत उपचारांना सुरुवात करता येईल.
हार्ट फेल्युअरच्या 17 टक्के रुग्णांचा या आजाराचे निदान झाल्यानंतर 90 दिवसांमध्ये मृत्यू होतो. या स्थितीसाठी आयुष्यभराचे व्यवस्थापन आणि उपचारांची गरज असते. म्हणूनच योग्य आणि वेळेवर उपचार मिळविण्यासाठी रुग्णांनी आपल्या हृदयरोगतज्ज्ञांना कोणताही गोष्टी न लपवता आपली सर्व माहिती देणे व त्यांच्या सातत्याने संपर्कात राहणे गरजेचे आहे. हार्ट फेल्युअरचे रुग्ण आपल्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करून, वेळच्यावेळी औषधोपचार घेऊन, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहून आणि उपचारांचे वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळून एक निरोगी आयुष्य जगू शकतात. याशिवाय आपल्या तब्येतीतील चढउतारांवर देखरेख ठेवणे आणि कोणतेही लक्षण बळावत असल्याचे किंवा अगदी किरकोळ बदल जरी दिसून आला तरीही डॉक्टरांना त्याची माहिती देणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारतात आलेल्या कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांच्या लाटेविषयी बोलताना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील कार्डिअक सायन्सेस विभागाचे संचालक डॉ. जमशेद दलाल म्हणाले, माझ्या प्रॅक्टिसदरम्यान गेल्या वर्षभरात हार्ट फेल्युअरच्या प्रमाणात 20 टक्के वाढ झाल्याचे मी पाहिले आहे. जागरुकतेचा अभाव आणि हार्ट फेल्युअरविषयीचे गैरसमज या गोष्टी वेळच्यावेळी उपचार घेण्याच्या व रोगव्यवस्थापनाच्या आड येत आहेत. हा आजार म्हणजे आयुष्याचा अंत नव्हे ही गोष्ट लोकांनी समजून घेणे गरजेचे आहे.औषधांपासून ते प्रगत उपकरणे व शस्त्रक्रियांपर्यंत उपचारांचे विविध पर्याय वापरून या आजाराचे परिणामकारकरित्या व्यवस्थापन करता येते.
या आजारावर अनेक औषधे उपलब्ध आहेत. त्यापैकी अलीकडेच उपलब्ध झालेली काही औषधे तुमच्या जीवनमानाचा दर्जा वाढवितातच पण त्याचबरोबर हृदयाच्या कार्यामध्ये सुधारणा घडवून आणत आयुर्मानही वाढवितात. औषधांचा उपकरणांच्या माध्यमातून केल्या जाणा-या उपचारांचा खर्च तसेच आयुष्यभर घेत राहावी लागणारी अनेक औषधे यामुळे हार्ट फेल्युअरचे व्यवस्थापन ही एक गुंतागुंतीची बाब बनली आहे. यातून नियमित औषधोपचारांमध्ये हयगय होते आणि ते आरोग्यासाठी घातक ठरते. उपचारांचे नियमित व काटेकोर पालन करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनशैलीत बदल करणे याचा हार्ट फेल्युअरच्या रुग्णांना प्रचंड फायदा होऊ शकतो व ते दीर्घकाळापर्यंत एक चांगले आयुष्य व्यतित करू शकतात.
धाप लागणे, थकवा, घोट्यांना किंवा पाय वा पोटाला सूज येणे, वजन वाढणे, नेहमीची कामे करताना थकवा येणे किंवा झोपताना श्वास नीट घेता यावा यासाठी पायाखाली उशी घ्यावी लागणे यांसारख्या सरसकट आढळून येणा-या लक्षणांकडे रुग्णांनी नेहमी लक्ष द्यायला हवे. धोक्याच्या लक्षणांचे सहज निदान झाल्यास रुग्णांना आपली स्थिती आटोक्यात ठेवता येईल व हार्ट फेल्युअरच्या प्रत्येक टप्प्यावर रुग्णाच्या आजाराच्या स्थितीनुसार उपचारांमध्ये बदल घडवून आणण्यास कार्डिओलॉजिस्टना मदत मिळेल.