मुंबई : 10 मार्च रोजी जगभरात जागतिक किडनी दिन साजरा केला जातो. लोकांमध्ये किडनीच्या (Kidneys) आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. शरीरात किडनीची भूमिका महत्त्वाची असते. हे शरीरातून कचरा आणि अतिरिक्त द्रव, दूषित घटक काढून टाकण्यास मदत करते. पाणी, मीठ आणि खनिजे यांचे संतुलन (Balance) राखण्यासाठी किडनीव्दारे आम्ल काढले जात असते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये किडनीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बदलती जीवनशैली (Lifestyle) व वाईट सवयी यामुळे किडनीचे आजार जडत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत किडनीची काळजी घेणे खूप गरजेचे असते. आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयी किडनी खराब करण्याचे काम करीत असतात, त्या जाणून घेणार आहोत.
नॉन-स्टेरॉइडल, अँटी-इंफ्लेमेटरी औषधे कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होतात. ही औषधे वेदना कमी करण्यासाठी प्रभावी कार्य करतात. परंतु त्याचा अतिवापर केल्याने किडनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः जर एखाद्याला आधीच मूत्रपिंडाचा त्रास असल्यास अशा व्यक्तीने पेनकिलरचा जपून वापर केला पाहिजे.
मीठ हे शरीराचा रक्तदाब वाढवण्यासाठी कारण ठरत असते. त्यामुळे किडनीच्या आजाराचा धोकाही वाढतो. जेवणात मीठ घालण्याऐवजी तुम्ही चवीचे मसाले घालू शकता. असे केल्याने तुम्ही मर्यादित प्रमाणात मीठ वापरू शकतात. परिणामी किडनीच्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
प्रक्रिया केलेले पदार्थ सोडियम आणि फॉस्फरसने समृद्ध असतात. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनी पॅकबंद अन्न खाणे टाळावे. जास्त फॉस्फरस, प्रक्रिया केलेले अन्न खाणे किडनी आणि हाडांसाठी हानिकारक असू शकते.
शरीराला ‘हायड्रेट’ ठेवल्याने किडनीला शरीरातील सोडिअम आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी स्टोन देखील टाळता येतो. निरोगी किडनी असलेल्या लोकांनी दररोज 3-4 लीटर पाणी प्यावे.
शरीर पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी रात्रीची चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. किडनीचे कार्य झोपण्याच्या चक्रानुसार नियंत्रित केले जाते.
जास्त गोड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्यामध्ये रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो. परिणामी या दोन्ही गोष्टी
किडनीचे आजार वाढवण्याचे काम करतात. शरीरात अतिरिक्त साखर घेणे टाळले पाहिजे.
धुम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. जे लोक धूम्रपान करतात त्यांच्या लघवीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त आढळण्याची शक्यता असते, ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते.
दररोज मद्यपान करणाऱ्यांमध्ये तीव्र किडनीच्या आजारांचा धोका दुप्पटीने वाढतो. किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी सिगारेट आणि दारूपासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत असतो.
जास्त वेळ बसून राहिल्याने किडनीचे आजार वाढवण्याची शक्यता असते. व्यायाम न करणे, बैठी जीवनशैलीमुळे किडनीवर वाईट परिणाम होतो.
नियमित सक्रिय जीवनशैली रक्तदाब योग्य ठेवते आणि चयापचय सुधारते हे सर्व किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असते.
मांसाहार केल्याने प्राण्यांमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे रक्तातील ॲसिडचे प्रमाण वाढते. ते किडनीसाठी हानिकारक ठरत असते. त्यामुळे ॲसिडोसिस होऊ शकतो. यामुळे मूत्रपिंड पुरेसे ॲसिड काढू शकत नसल्याने यातून किडनीचे विकार होऊ शकतात.
इतर बातम्या