नवी दिल्ली: किडनी (kidney)हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीरात असलेले खराब पदार्थ आणि रसायने शरीराच्या पाण्याच्या स्वरूपात काढून टाकणे हे किडनीचे काम आहे. पण किडनीमध्ये असाही एक आजार होऊ शकतो, ज्यामध्ये लहान लहान गाठी तयार होऊ लागतात. याला पॉलिसिस्टिक किडनी डिसीज (Polycystic Kidney Disease) असे म्हणतात. त्यावर वेळीच उपचार न झाल्यास गंभीर परिस्थिती (health problems) उद्भवू शकते. त्यामुळे वेळीच या रोगाची लक्षणे ओळखून या समस्येवर नियंत्रण मिळवता येते.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गेल्या काही वर्षांत पॉलिसिस्टिक किडनी आजारात झपाट्याने वाढ होताना दिसून आली आहे. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. या आजारात किडनीमध्ये सिस्ट तयार होते व त्यात पाणीही जमा होऊ लागते. कधीकधी फोडही येऊ शकतो. या आजारात किडनीच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. न्यूरोलॉजिस्ट डॉ. हिमांशू शर्मा यांच्या सांगण्यानुसार, जर या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर किडनी निकामी होऊ शकते. या स्थितीत डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटचीही गरज भासू शकते.
हा आजार होण्यामागे काही विशेष कारण नसल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. हा एक अनुवांशिक आजार आहे, जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येतो. पॉलिसिस्टिक किडनी डिसीजचा संसर्ग झालेल्या लोकांना यकृत आणि स्वादुपिंडामध्ये समस्या होण्याचा धोका देखील असतो. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना पॉलीसिस्टिक किडनी आजार होण्याची शक्यता जास्त असते.
या आजाराची लक्षणे फार उशीरा आढळून येतात. वयाच्या 40 व्या वर्षानंतर शरीरातील समस्या वाढू लागतात. त्याचवेळी पॉलिसिस्टिक किडनी डिसीजची लक्षणे आढळून येतात.
– पोटाचा आकार वाढणे
– लघवी करताना रक्त येणे
– पाठीत सतत दुखणे अथवा वेदना होत राहणे
– वारंवार लघवी होणे
एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती पॉलिसिस्टिक किडनी डिसीजग्रस्त असेल तर हा आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतो. अशावेळी किडनीमध्ये सिस्टची ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. वेळेवर उपचार केल्यास आजारावर सहज नियंत्रण मिळवता येते. योग्य वेळी उपचार केल्यास सिस्टच्या समस्येवर उपचार होतात, मात्र याबाबत निष्काळजीपणा दाखवल्यास पुढील काही वर्षांत किडनीचेही नुकसान होऊ शकते.