नवी दिल्ली – आपण जो आहार (food) खातो त्याचा आपल्या शरीरासाठी इंधन म्हणून वापर होतो. त्याचप्रमाणे, पोषक तत्वांनी समृद्ध आहार घेतल्यास डोळ्यांच्या अनेक समस्या (eye problems) दूर होऊ शकतात. आपले डोळे म्हणजे जटिल अवयव आहेत. त्यांचे कार्य योग्य पद्धतीने व्हावे यासाठी वेगवेगळी व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्वांची (nutritions) आवश्यकता असते. व्हिटॅमिन्स ही नैसर्गिक मॉलीक्यूल्स असतात, ज्यांची (आपली) वाढ होण्यासाठी व मेटाबॉलिज्मसाठी आवश्यकता असते. फळं आणि भाज्या या अन्नातून आपले शरीर हे नैसर्गिकरित्या शोषून घेऊ शकते. एवढेच नव्हे तर डॉक्टरही डोळ्यांसाठी व्हिटॅमिन्स घेण्याचा सल्ला देतात. डोळ्यांसाठी कोणती व्हिटॅमिन्स सर्वोत्तम मानली जातात, हे जाणून घेऊया.
मेडिकल न्यूज टुडेच्या सांगण्यानुसार, डोळ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी व्हिटॅमिन ए, सी आणि ई आवश्यक आहेत. याशिवाय बी व्हिटॅमिन आणि इतर पोषक घटक यांचीही त्यात महत्वाची भूमिका आहे. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ही व्हिटॅमिन्स असलेला आहार नक्की सेवन करावा.
व्हिटॅमिन ए : व्हिटॅमिन ए याला रेटिनॉल असेही म्हटले जाते. हे आपल्या दृष्टीसाठी चांगले मानले जाते. रताळं, गाजर, लाल भोपळी मिरची, भोपळा, संत्री, हिरव्या भाज्या, कॉड लिव्हर तेल इत्यादींमधून व्हिटॅमिन ए मिळू शकते.
व्हिटॅमिन बी : व्हिटॅमिन बी हे वॉटर सॉल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे आहेत, जी पेशींच्या मेटाबॉलिज्ममध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. असे म्हटले जाते की व्हिटॅमिन बी 3ची कमतरता असेल तर काचबिंदू होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन बी 1 घेतल्याने डोळे कोरडे होण्याच्या आजाराची लक्षणे कमी होतात. डाळी, सोयाबीन, मासे, दही, दूध, बदाम, हिरव्या भाज्या, अंडी इत्यादी पदार्थ हे व्हिटॅमिन बी चा उत्तम स्त्रोत आहेत.
व्हिटॅमिन सी : व्हिटॅमिन सी हे डोळ्यांना फ्री रॅडिकल डॅमेजपासून वाचवते. एवढंच नव्हे तर कोलेजनच्या निर्मितीतही ते आवश्यक असते. ब्रोकोली, बटाटे तसेच संत्री, स्ट्रॉबेरी हे सी व्हिटॅमिनचा उत्तम स्त्रोत आहेत.
व्हिटॅमिन ई : व्हिटॅमिन ई हे सर्वोत्तम मानले जाते, ज्यामुळे आपली दृष्टी सुधारते. व्हिटॅमिन ई एक अँटीऑक्सिडेंटही आहे, जे डोळ्यांचे फ्री रॅडिकलमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करते. सूर्यफूलाचे तेल, सोयाबीनचे तेल आणि शेंगदाणे, पालक, भोपळा, आंबा, किवी, ब्लॅकबेरी इत्यादी पदार्थांपासून आपण व्हिटॅमिन ए मिळवू शकता.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)