नवी दिल्ली – जगभरात ब्रेस्ट कॅन्सरची ( स्तनाचा कर्करोग) (breast cancer) प्रकरणे वेगाने वाढत आहेत. याआधी हा आजार 50 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना झालेला दिसून यायचा, मात्र आता खराब लाइफस्टाइल (bad lifestyle) व खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या महिलाही या आजाराला बळी पडताना दिसत आहेत. कॅन्सरबाबत असे म्हटले जाते की, त्याची लक्षणे लवकर ओळखली तर या जीवघेण्या आजारावरही उपचार करून सहज मात करता येते. मात्र पुरेशा जनजागृतीअभावी लोकांना कॅन्सरची लक्षणे (symptoms) कळत नाहीत. यामुळे, ब्रेस्ट कॅन्सरच्या 90 टक्के प्रकरणांची नोंद ही ॲडव्हान्स स्टेजमध्ये केली जाते.
अनेक प्रकरणांमध्ये महिलांमध्ये (कॅन्सरची) लक्षणे लवकरदेखील दिसायला लागतात , मात्र त्यांना याबबात माहिती नसते. वेळेवर चाचणी न केल्याने हा आजार वाढतो व ( काही वेळेस) मृत्यूस कारणीभूतही ठरतो. काही महिलांमध्ये कॅन्सरचा धोका खूप जास्त असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत त्यांनी दर सहा महिन्यांनी एकदा कॅन्सरची तपासणी करून घ्यावी. कोणत्या महिलांनी कॅन्सरची चाचणी करून घेतली पाहिजे याची माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
या महिलांनी करावी कॅन्सरची तपासणी
कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अनुराग कुमार यांनी सांगितले की, जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीला स्तनाचा कर्करोग झाला असेल तर तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत जर एखाद्या महिलेच्या कुटुंबात तिच्या आईला आधीच कॅन्सर झाला असेल तर त्या महिलेने वयाची 30 वर्षे पार केल्यानंतर दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा क२न्सरची तपासणी करावी. कोणतीही लक्षणे दिससली नाहीत तरी तुम्ही कॅन्सरची टेस्ट करू शकता.
ही लक्षणे दिसल्यास तपासणी करणे गरजेचे
एखाद्या सामान्य महिलेने ४० व्या वर्षानंतर दरवर्षी कॅन्सरची चाचणी केली पाहिजे. जर एखाद्या स्त्रीचे वय 25 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तिला स्तनात गाठ जाणवत असेल अथवा स्तनाग्रात बदल जाणवला असेल किंवा स्त्राव होत असेल, तर अशा परिस्थितीत त्वरित कॅन्सरची चाचणी करावी. एक्स-रे मॅमोग्राफी, सीटी आणि पीईटी स्कॅन यासारख्या चाचण्यांद्वारे स्तनामधील दोष शोधले जाऊ शकतात.
या मार्गांनी रोखता येऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर
ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आपली जीवनशैली योग्य ठेवणं आणि खाण्यापिण्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे, असे डॉक्टरांनी नमूद केले आहे. कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर धूम्रपान व मद्यपान करू नये. तसेच दररोज व्यायाम करणे अथवा ॲरोबिक्स करणे, हेदेखील उपयुक्त ठरेल. ज्या महिलांची प्रसूती झाली असेल त्यांनी आपल्या लहान मुलांना स्तनपान जरूर केले पाहिजे. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की स्तनपान केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो.