आपल्याकडून चेहऱ्याची काळजी नेहमीच घेतली जाते मात्र केसांची काळजी घेण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही किंवा ठरवून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हिवाळ्यात कोंड्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात वाढते.कोंड्याच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात. तुम्हाला काही नैसर्गिक गोष्टींबद्दल माहिती आहे का ?ज्या कोंड्याची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी प्रभावी ठरवू शकतात. या हिवाळ्यात तुम्हाला तुमच्या केसांना कोंड्याच्या हल्ल्यापासून वाचवायचे असेल तर तुम्ही तुमच्या केसांची निगा राखण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहू शकता याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
मेथीचे दाणे
मेथीचे दाणे देखील कोंड्याची समस्या टाळण्यास मदत करू शकतात. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेले मेथीचे दाणे बारीक करून त्याची पेस्ट बनवा. तुमच्या संपूर्ण डोक्याला ही पेस्ट लावून अर्धा तास ठेवा. त्यानंतर तुम्ही सौम्य शाम्पू वापरून तुमचे केस धुवून टाका.
संत्र्याची साल
संत्र्याची साल वापरून तुम्ही कोंडा दूर करू शकतात. संत्र्याची साल बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळा आणि ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा याचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला ही पेस्ट तुमच्या डोक्यांवर अर्धा तास ठेवावी लागेल आणि नंतर तुमचे केस स्वच्छ धुऊन टाका.
कडुलिंबाची पाने
कडुलिंबाच्या पानांमध्ये आढळणारे सर्व घटक तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात. कडुलिंबाची पाने बारीक करून त्यांचा रस काढावा लागतो. कडुलिंबाच्या पानाचा रस केसांवर दहा ते पंधरा मिनिटे व्यवस्थित लावून ठेवा आणि त्यानंतर केस धुतल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील.
केळी वापरू शकता
कोंड्यापासून मुक्त होण्यासाठी सर्वप्रथम केळी कुस्करून घेणे आवश्यक आहे. आता कुस्करलेल्या केळीमध्ये ॲपल साइडर विनेगर मिसळून ही पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावून वीस मिनिटे तशीच ठेवा. त्यानंतर तुम्ही तुमचे केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.