जन्माच्या वेळी अनेक नवजात बालकांच्या शरीरावर केस (अंगावरील लव) दिसून येतात. कधी त्यांचे प्रमाण कमी असते तर कधी जास्त. मात्र बऱ्याच वेळेस हे केस किंवा अंगावरील लव चांगली दिसत नाही. ते कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी बाळाची आई प्रयत्नही करते. लहान मुलांच्या (new born babies) अंगावर केस असणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. त्यांच्या अंगावर केस कमी आहेत की जास्त हे त्यांच्या जनुकांवर अवलंबून असते. मात्र त्यांच्या शरीरावरील केस अतिशय मऊ असतात आणि काही घरगुती उपयांनी ते (hair removal) काढता येतात. घरातील रोजच्या वापरातील काही पदार्थांच्या मदतीने घरगुती उटणं (home remedies) तयार करून ते नियमितपणे वापरल्यास लहान मुलांच्या अंगावरील हे केस कमी होऊ शकतात.
केस कमी करण्यासाठी जाणून घेऊया काही घरगुती उपाय:
लहान बालकांच्या शरीरावरील केस कमी करायचे असतील तर गव्हाचे पीठ म्हणजेच कणीक वापरणे, हा सर्वात प्रभावी उपाय आहे. यासाठी गव्हाच्या पीठाचं उटणं तयार करून मुलांच्या शरीरावर ज्या भागावर केस आहेत, तिथे ते चोळून लावावे. यामुळे नैसर्किग पद्धतीने शरीरावरील केस कमी होतात. हे उटणं बनवण्यासाठी एका वाटीत थोडं गव्हाचं पीठ घ्यावं. त्यामध्ये थोडी हळद आणि बदामाचे तेल घालून घट्टसर मिश्रण तयार करावे. आता हे मिश्रण शरीरावर लावून हलक्या हाताने चोळावे. याचा नियमित वापर केल्यास केस हळूहळू कमी होतात.
नवजात बालकांच्या शरीरावरील केस काढण्यासाठीचा आणखी एक उत्तम उपाय म्हणजे दूध व हळद. एका वाटीत थोडी हळद घेऊन त्यात हळूहळू दूध मिसळा. त्याची थोडी जाडसर पेस्ट बनवून लहान मुलांच्या शरीरावर लावा. मुलांचे मालिश झाल्यावर नियमितपणे हे मिश्रण लावून चोळावे. ते वाळल्यानंतर एक मऊ कापड घेऊन ते भिजवून घ्यावे व त्याने लहान बालकांच्या शरीरावरील मिश्रण पुसून काढावे. त्यानंतर लहान मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घालावी.
लहान मुलांच्या अंगावरील केस हटवण्यासाठी बेसन म्हणजेच चणाडाळीचे पीठ अतिशय उपयुक्त आहेच, त्यासोबतच ते त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. यासाठी एका वाटीत थोडे बेसन घेऊन त्यामध्ये चिमुटभर हळद आणि दूध घालून एकत्र मिसळावे. हळद व दुधाच्या मिश्रणाप्रमाणेच बेसनाचे हे मिश्रणाही लहान मुलांच्या अंगावर जिथे केस जास्त आहेत, तिथे लावावे आणि हळूवार हाताने चोळावे. ते वाळल्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ घालावी. दुधाऐवजी दह्याचाही वापर करू शकता. अशा तऱ्हेने नैसर्गिक पद्धतीने तुम्ही लहान मुलांच्या अंगावरील अतिरिक्त केस घालवू शकता.
( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )