नवी दिल्ली – स्मरणशक्ती (sharp memory) चांगली असेल तर त्याचा तुमच्या पर्सनॅलिटीवर वेगळा फरक पडतो. ज्यांची स्मरणशक्ती उत्तम असते, असे लोक सर्वांनाच आवडतात. तुमच्या या गुणामुळेही लोकं तुमची आठवण काढतात. स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे तुम्ही लोकांना आणि त्यांनी काय म्हटलं हे बराच काळ विसरत नाही. थोडासा प्रयत्न केल्यावर तुम्हाला सगळं सहज आठवतं. पुस्तके वाचण्याबरोबरच कोडी सोडवल्याने (solving puzzles) स्मरणशक्ती वाढते, असं मानलं जातं. तुम्हीही तुमच्या दैनंदिन अशा काही सवयी अंगिकारू शकता, ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती (boost memory) आणखी वाढेल.
पुरेशी झोप घेणे
झोप ही आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. चांगले आरोग्य हवे असेल तर दररोज रात्री चांगली आणि गाढ झोप लागणं खूप महत्वाचं आहे. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, दररोज रात्री 7 ते 8 तास चांगली झोप घ्यावी. यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि तणाव दूर राहतो. जेव्हा तुमच्या मनातील ताण कमी होईल, तेव्हा तुम्हाला गोष्टी सहज लक्षात ठेवता येतील आणि स्मरणशक्ती वाढेल.
पौष्टिक आहार महत्वाचा
नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर सकस व पौष्टिक आहार घेणं खूप गरजेचं आहे. डोकं चांगलं चालायला हवं असेल तर अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-3ने समृद्ध असलेली फळं आणि भाज्या खाव्यात.
मद्यपानापासून दूर रहावे
मद्यपान केल्यामुळे मेंदू योग्य प्रकारे कार्य करत नाही. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूच्या पेशी नष्ट होतात, यामुळे स्मरणशक्तीवर खूप परिणाम होतो. मद्यपानामुळे हळूहळू स्मरणशक्ती कमी होत जाते.
योगासने
व्यायाम, योगासने केलयामुळे आपला मेंदू तल्लख होतो आणि बुद्धी तीक्ष्ण होते. योगासनांचा मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. चांगल्या स्मरणशक्तीसाठी दररोज योगासने केली पाहिजेत. त्यामुळे तणावही दूर राहतो. योगा केल्याने स्मरणशक्ती तर वाढेलच पण आजारांपासूनही मुक्ती मिळेल.
तणावापासून दूर राहा
जास्त ताण घेणे हे मेंदूच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. कोणतेही काम शांत राहून करण्याचा प्रयत्न करा. कदाचित सुरवातीला ते थोडं अवघड वाटेल, पण हळूहळू त्यातही यश मिळेल.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)