पाणी प्यायल्यानंतरही तहान भागत नाही का? असू शकते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला पौष्टिक आहाराची जितकी गरज असते, तितकेच दिवसभर भरपूर पाणी पिणेही गरजेचे आहे. आपण नेहमी वाचत असतो किंवा ऐकतो कि कोणताही ऋतू असो, सर्व लोकांनी किमान तीन-चार लिटर पाणी नियमितपणे प्यावे. कारण दिवसभर पाणी पित राह्ल्याने तुमच्या शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी, शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन राखण्यासाठी आणि अवयवांना चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी हे आवश्यक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जास्त पाणी पिणे किंवा जास्त तहान लागणे आरोग्यासाठी चांगले नाही.
आरोग्य तज्ञांच्या मते, तुम्ही जर मसालेदार पदार्थ किंवा अधिक ताकद लावून व्यायाम केला की तहान लागणे सामान्य आहे. विशेषत: अधिक तहान आपल्याला उन्हाळाच्या दिवसात लागते. पण कधीकधी आपली तहान इतर वेळेपेक्षा जास्त असू शकते आणि पाणी प्यायल्यानंतरही तहान सतत लागत राहते.अशा प्रकारची परिस्थिती आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही. त्यामुळे जास्त किंवा वारंवार तहान लागणे देखील काही प्रकरणांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
वारंवार किंवा जास्त तहान लागण्याच्या अवस्थेला वैद्यकीय भाषेत पॉलीडिप्सिया म्हणतात. जर तुम्हाला सतत तहान लागत असेल, भरपूर पाणी प्यायल्यानंतरही तुम्हाला तहान भागत नसेल तर हे काही प्रकारच्या आजारांचे लक्षण असू शकते. मधुमेह किंवा मधुमेह इन्सिपिडस सारख्या समस्यांनी ग्रस्त लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून आली आहे.
तुम्हाला मधुमेह इन्सिपिडस आहे का?
मधुमेह इन्सिपिडसने ग्रस्त लोकांना वारंवार तहान लागण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मधुमेह इन्सिपिडसला मधुमेह मेलिटस म्हणून चुकीचे समजू नये. मधुमेह इन्सिपिडस आपल्या मूत्रपिंडांवर आणि त्यांच्याशी संबंधित ग्रंथी आणि संप्रेरकांवर परिणाम करते. यामुळे शरीरात लघवी येण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते, ज्यामुळे आपल्याला जास्त किंवा वारंवार तहान देखील लागू शकते.
पोटॅशियमची कमतरता
हायपोक्लेमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये आपल्या रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक प्रमाणात कमी होत असते, यामुळे हायपोक्लेमिया या आजाराशी ग्रस्त लोकांना जास्त किंवा वारंवार तहान लागण्याची समस्या देखील असू शकते. तसेच उलट्या-अतिसार, काही औषधांचे अतिसेवन यामुळे शरीरातील पोटॅशियमच्या पातळीवर परिणाम होतो. जर ही समस्या दीर्घकाळ कायम राहिली तर तुम्हाला जास्त तहान लागण्याची समस्या उद्भवू शकते.
शरीराच्या लक्षणांकडे लक्ष द्या
तहान ही आपल्या शरीराचा द्रव कमी झाल्याचे सांगण्याचा मार्ग आहे. सामान्य परिस्थितीत पाणी प्यायल्याने तहान भागते. तथापि, जर पाणी पिण्याची इच्छा कायम राहिली किंवा प्यायल्यानंतरही संपत नसेल तर हे आरोग्याच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते, या लक्षणाला दुर्लक्ष न करता लगेच तुमच्या आरोग्य तज्ज्ञांची भेट घ्या.