नवी दिल्ली – एक्टोपिक प्रेग्नन्सी (Ectopic pregnancy) ही गरोदरपणातील एक गंभीर (serious condition) स्थिती असून त्याला अस्थानिक अथवा स्थानभ्रष्ट गर्भधारणा असेही म्हटले जाऊ शकते. या परिस्थितीमध्ये गर्भधारणा ही गर्भाशयात होण्याऐवजी गर्भनलिकेमध्ये होते. मात्र काही वेळेस ती इतरत्र म्हणजेच ओव्हरी किंवा सर्व्हिक्स या ठिकाणी होऊ शकते. एक्टोपिक प्रेग्नन्सी होण्याचे प्रमाण (chances are less) खूप कमी आहे. साधारण 50 स्त्रियांपैकी एका स्त्रीमध्ये अशी अवस्था निर्माण होऊ शकते.
सामान्यत: गर्भ हा गर्भाशयात वाढणे आवश्यक असते. मात्र तसे न होता तो गर्भ गर्भनलिकेत वाढू लागल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. कारण गर्भनलिकेमध्ये गर्भाची पुरेशी वाढ होण्यासाठी जागा नसते. त्यामुळे काही ठराविक आकारापर्यंत वाढ झाल्यानंतर गर्भनलिका फुटून गर्भ बाहेर पडतो. त्यावेळी गर्भनलिकेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. अशा वेळेस तातडीने उपचार झाले नाहीत तर त्या स्त्रीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
एक्टोपिक प्रेग्नन्सीची कारणे –
गर्भाशयात गर्भ न राहता तो गर्भनलिकेत राहण्याची अनेक कारणे असू शकतात.
– हार्मोन्समधील असंतुलन
– अनुवांशिकता
– यापूर्वी एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली असल्यास ती पुन्हा होण्याची शक्यता वाढते.
– एखादा आजार किंवा पूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेमुळे गर्भाशय अथवा गर्भनलिकेत संसर्ग झाला असल्यास.
– काही कारणास्तव गर्भनलिकेची शस्त्रक्रिया झाली असल्यास एक्टोपिक प्रेग्नन्सी होण्याची शक्यता अधिक असते.
– तसेच धूम्रपान करणाऱ्या महिला किंवा वयाच्या 35-40 व्या वर्षानंतर गरोदर झालेल्या स्त्रियांमध्ये एक्टोपिक प्रेग्नन्सीचा धोका अधिक असतो.
एक्टोपिक प्रेग्नन्सीचे निदान कसे होते ?
एखादी स्त्री गरोदर राहिल्यास तिची तपासणी व सोनोग्राफी केल्यानंतर एक्टोपिक प्रेग्नन्सी आहे की नाही हे समजू शकते. काही वेळेस सोनोग्राफीतून नीट आकलन न झाल्यास रक्त तपासणीवरूनही एक्टोपिक प्रेग्नन्सीचे निदान केले जाते.
(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)