कीव – 24 फेब्रुवारी 2022 म्हणजेच 100 दिवसांपूर्वी नाटोच्या सदस्यत्वाच्या मुद्द्यावर रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia-Ukraine war)निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीत, रशियाचे राष्ट्राध्य़क्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)यांनी युद्धाची घोषणा केली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत गेल्या 100 दिवसांत युक्रेनचे चित्र पूर्णपणे पालटून गेले आहे. कधी चकचकीत असलेले, वीजांनी उजळलेली युक्रेनी शहरे आता पडक्या वाड्यांप्रमाणे विदीर्ण अवस्थेत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाची झळ पूर्व युरोपासह इतरही देशांना सहन करावी लागली आहे. याचा फटका भारतालाही (Impact on India)सहन करावा लागला आहे. रशिया-युक्रेनसह भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि जगाला नेमका या युद्धाचा कसा फटका बसला आहे हे जाणून घेऊयात.
युद्ध सुरु झाल्यानंतर तीन महिन्यांच्या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 1 लाख कोटी रुपयांची केलेली गुंतवणूक परत काढून घेतली आहे. यापूर्वीचा विचार केला तर त्यापूर्वीच्या 9 महिन्यांत एकूण 50 हजार कोटीच बाजारातून माघारी गेले होते. भारतासह देशातील नव्याने उदयास येत असलेल्या बाजारांना महागाईच्या कारणामुळे चलन तुटवट्याचा सामना करावा लागतो आहे.
या युद्धामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची रेकॉर्ड घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माहितीनुसार, 23 फएब्रुवारीला युद्ध सुरु होण्यापूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपया 74.6 रुपये इतका होता, तो 31 मे रोजी घसरुन 77.7 रुपये इतका कमी झाला आहे. तर दुसरीकडे 2022 च्या सुरुवातील आंकरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल म्हणजे कच्च्या तेलाची किंमत ही प्रति बॅरल 80 डॉलर होती ती वाढून युद्धानंतर आता 128 डॉलर प्रति बॅरल या स्तरावर पोहचली आहे.
भारताचा वार्षिक महागाई दर एप्रिल 2022 मध्ये 7.8 टक्क्यांवर पोहचला आहे. जो मे 2014 नंतरचा सर्वाधिक महागाई दर आहे. अन्नधान्याचा महागाई दर सातत्याने सातव्या महिन्यात वाढून 8.4 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. 31 मे रोजी वनस्पती तेलाच्या किंमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.6 टक्के भाववाढ नोंदवण्यात आली आहे. तर गव्हाच्या किंमती 14.3 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यासह जगाचा विचार केला तर जगातील 45 देशांना गंभीर अन्नसंकटाला सामोरे जावे लागले आहे.
रशियाने पुकारलेल्या युद्धामुळे, 68 लाख युक्रेनी नागरिकांवर देश सोडण्याची वेळ आली आहे. ही संख्या युक्रेनच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता 15 टक्के आहे. युक्रेनमधील प्रत्येक 6 माणसांपैकी एकाला देशातून पलायन करण्याची वेळ आलीये. UNHRCच्या अहवालानुसार या 68 लाख नागरिकांपैकी 36 लाख युक्रेनी हे पोलंडला पोहचले आहेत. त्यामुळे पोलंडची लोकसंख्या 10 टक्क्यांनी वाढली आहे.
2021 साली युक्रेनची लोकसंख्या 4.3 कोटी होती ती आता 3.7 कोटी एवढी कमी झाली आहे. दुसरीकडे युक्रेनमध्ये अंतर्गत रचनेत 80 लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. यामुळे एक मोठे मानवी संकट उभे राहिले आहे. युक्रेनमध्ये प्रत्येक क्षणाला एक लहान मुलगा शरणार्थी होतो आहे, इतक्या या संकटाचे स्वरुप विक्राळ आहे.
या सगळ्या रशियाची नाकेबंदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाशअचिमात्य देशांनी, सातत्याने रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. युद्ध सुरु झाल्यानंतर रशियावर 5831 निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यातील सर्वाधिक 1144 निर्बंध हे अमेरिकेने लादलेले आहेत. यासह 4800 हून अधिक रशियन नागरिकांवर बंदी घालण्यात आली आहे. 562 संस्था आणि 458 कंपन्यांना प्रतिबंधाच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. 2014 पासूनचा विचार केला तर रशियावर आत्तापर्यंत 10,159 प्रतिबंध लादण्यात आले आहेत.