वॉशिंग्टन | 26 ऑक्टोबर 2023 : अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीये. अमेरिकेच्या मेने राज्यातील लेव्हिस्टन येथे काल रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन माथेफिरू शुटरने अंधाधूंद गोळीबार केल्याने या हल्ल्यात कमीत कमी 22 लोक ठार झाले आहेत. तर डझनभर नागरिक जखमी झाले आहेत. यातील अनेक जखमी गंभीर असून त्यांच्यावर उपाचर सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण अमेरिका हादरून गेला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे.
या हल्ल्यानंतर एंड्रोस्कोगिन काऊंटी शेरिफ कार्यालयाने (पोलीस) त्यांच्या फेसबुक पेजवर दोन संशयित हल्लेखोरांची फोटो जारी केले आहेत. त्यात एक बंदूकधारी हल्लेखोर त्याच्या खांद्यावर शस्त्र घेऊन प्रतिष्ठानमध्ये प्रवेश कताना दिसत आहे. तो सध्या फरार आहे. एका व्यापारी संकुलावर हा हल्ला करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
पोलिसांनी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नागरिकांकडून मदत मागितली आहे. लांब शर्टवर जीन्स घातलेला आणि दाढीवाल्या व्यक्तीने फायरिंग केली आहे. कुणाला त्याच्याबद्दल माहिती असेल तर कळवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. लेव्हिस्टनमध्ये सेंट्रल मेने मेडिकल सेंटरने एक पत्रक जारी केलं आहे. यात त्यांनी या दुर्घटनेत अनेकांचे प्राण गेल्याचं म्हटलं आहे.
अनेकजण जखमीही झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं या पत्रकात म्हटलं आहे. लेव्हिस्टन एंड्रोस्कोगिन काऊंटीचा एक भाग आहे. मेनेचे सर्वात मोठे शहर पोर्टलँडपासून 56 किलोमीटरवर उत्तरेला आहे.
आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत, असं एंड्रोस्कोगिन काऊंटी शेरिफच्या कार्यालयाने म्हटलं आहे. तर मेने डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टीच्या प्रवक्त्याने लोकांना आपल्या घराचे दरवाजे बंद करून घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे.
तीन वेगवेगळ्या व्यापारी संकुलाच्या ठिकाणी गोळीबार झाला आहे आहेत. त्यात स्पेअरटाईम रिक्रिएशन, स्कीमेंजीस बार अँड ग्रील रेस्टॉरंट आणि एका वॉलमार्ट ड्रिस्ट्रीब्यूशन सेंटरचा समावेश आहे, अशी माहिती लेव्हिस्टनच्या पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे. दरम्यान, या गोळीबाराची माहिती राष्ट्रपती जो बायडेन यांना देण्यात आली आहे. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.