मुंबई : डिसेंबर महिन्यात अनेक जण आपल्या कुटुंबासोबत फिरण्यासाठी बाहेर पडतात. कारण या महिन्यात कुठे बर्फवृष्टी होऊन गेलेली असते तर कुठे गुलाबी थंडी असते. पण या दरम्यान विशेष काळजी न घेतल्याने अनेक घटना घडतात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेच्या ऍरिझोना राज्यात भारतीय वंशाच्या तीन लोकांचा बर्फाने गोठलेल्या तलावात बुडून मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तलावावर जमलेल्या बर्फाच्या थरावर फिरत असताना बर्फ तुटला आणि तिघं जण तलावात बुडाले.
26 डिसेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. नारायण मुद्दना, गोकुळ आणि हरिता मुद्दना अशी मृतांची नावे आहेत.तलावात पडल्याची माहिती मिळताच लगेचच बचावपथक तेथे पोहोचलं. तिघांना बाहेर काढण्यात आले पण त्यांना वाचवता आले नाही.
अमेरिकेत बर्फाच्या वादळामुळे सध्या जनजीवन विस्कळीत झाले आहे. बर्फाच्या वादळामुळे आतापर्यंत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.
हिमवादळामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. खाजगी गाडीने प्रवास करणं ही अवघड झालं आहे.लोकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे.