बगदाद : इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरात एका रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाला (Iraq hospital fire). या स्फोटामुळे रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत तब्बल 82 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. तर 100 पेक्षा जास्त रुग्ण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधितांवरही उपचार सुरु होता. या घटनेवर जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अतिदक्षता विभागात सर्वात आधी आग लागली
बगदाद येथील अल खतीब हॉस्पिटलमध्ये ही दुर्घटना घडली (Iraq hospital fire). रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरु होता. तिथूनच ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग लागली तेव्हा रुग्णालयात मोठा गदारोळ सुरु झाला. रुग्ण, डॉक्टर जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. या गदारोळा संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही लोक तर जीव वाचवण्यासाठी थेट रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारत होते.
अग्निशमन दलाकडून अनेकांना वाचवण्याचा शर्थीने प्रयत्न
रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग मोठी होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच आत अडकलेल्या रुग्नांना बाहेर काढणं हे मोठं आव्हान होतं. अग्निशमन दल, प्रशासन, स्वयंसेवक यांनी रुग्णांना बाहेर काढण्याचा शर्थीने प्रयत्न केला. मात्र, या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला.
इराकच्या पंतप्रधानांकडून चौकशीचे आदेश
इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी या घटनेप्रती संवेदना व्यक्त केल्या. ही घटना अतिशय दुर्देवी असून या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणी जो दोषी ठरेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान कदीमी यांनी या घटनेनंतर तातडीची बैठकही बोलावून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या घटनेची चौकशी करुन 24 तासात त्याचा रिपोर्ट सादर करावा, असा आदेश पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिला.
घटने संबंधित सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ :
#UPDATE | At least 30 people died in the fire broke out in the hospital that Covid-19 patients were treated in #Baghdad/#Iraq. https://t.co/toGAPqBAAN pic.twitter.com/46BydNA945
— Dailyaz (@dailyaz1) April 24, 2021