ढाका – दक्षिण पूर्व बांग्लादेशमध्ये (Bangladesh) एका खासगी कंटेनर डेपोमध्ये शनिवारी रात्री स्फोट (blast) झाला. यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत. चाटगाव परिसरात सीताकुंड (Seetakunt) उपजिल्ह्यात कदमरासुलमध्ये असलेल्या बीएम कंटेनर डेपोत शनिवारी रात्री आग लागल्याने ही दुर्घटना घडाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही अग्निशमन दलातील जवानांनाही यात प्राण गमवावे लागले आहेत. आत्तापर्यंत असे तीन अग्मिशमन दलातील जवान यात मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी आहे. शनिवारी रात्री चितगावच्या सीताकुंडा उपजिल्हामधील कदमरसूल भागात आगीची घटना घडली. तेथील बीएम कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत 40 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बांगलादेश अग्निशमन सेवेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर डेपोला लागलेल्या आगीच्या घटनेत त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.