वॉशिंग्टन : अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर हल्ला करणाऱ्यांना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आव्हान दिलंय. हल्लेखोरांना याची किंमत चुकवावी लागेल. याचा आम्ही बदला घेऊ आणि त्याचं ठिकाण आणि वेळ आमचीच असेल, असं म्हणत त्यांनी आयसिसच्या हल्लेखोरांना दम भरलाय. या हल्ल्यात अमेरिकेचे जवळपास 13 सैनिक मारले गेले तर अनेकजण जखमी झालेत. त्यामुळे अमेरिका याला सडेतोड उत्तर देण्याच्या तयारीत आहे. यासाठी बायडन यांनी अमेरिकन सैन्याला प्लॅन आखण्याचे आदेश दिल्याचीही माहिती त्यांनी दिली. आम्ही हा हल्ला विसरणार नाही, तुम्हाला माफ करणार नाही. आता आम्ही तुमची शिकार करु आणि या मृत्यूंचा बदला घेऊ, असं मत जो बायडन यांनी व्यक्त केलंय.
जो बायडन म्हणाले, “आम्ही अफगाणिस्तानमधील अमेरिकन नागरिकांना वाचवू. आमचं मिशन सुरू असून अफगाणच्या सहकाऱ्यांना आम्ही बाहेर काढू. काबुल विमानतळाबाहेरील हल्ल्यात मारले गेलेले अमेरिकन सैनिक हिरो होते. ते इतरांना वाचवण्यासाठी एक धोकादायक आणि निस्वार्थी मोहिमत सहभागी होते. अजूनही कमीत कमी 1,000 अमेरिकन नागरिक आणि इतर अनेक लोक काबुलमधून निघण्यासाठी संघर्ष करत आहेत.”
“We will not forgive. We’ll not forget. We will hunt you down and make you pay,” US President Joe Biden to Kabul bombers pic.twitter.com/H3BFTLzZ77
— ANI (@ANI) August 26, 2021
“अमेरिकेला हे माहिती आहे की या हल्ल्याचा आदेश देणारा आयसिसचा नेता कोण होता? तो कोठेही असेल, तरी त्याला कोणतंही मोठं मिलिट्री ऑपरेशन न करता आम्ही पकडू. मिलिट्री कमांडर्सला ISIS-K वर स्ट्राईक करण्याचा प्लॅ करण्यास सांगण्यात आलंय. आता जागाही आम्ही निवडलेली असेल आणि वेळही, तिथेच हल्लेखोरांना उत्तर देऊ,” असं मत बायडन यांनी व्यक्त केलं.
काबुल विमानतळावरील हल्ल्यात तालिबान आणि आयसिसचं संगनमत असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, अशी माहिती बायडन यांनी दिली. या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह जवळपास 90 जणांचा मृत्यू झालाय. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. याशिवाय शेकडो लोक जखमी झालेत. या हल्ल्यानंतर ISIS-K या दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी घेतलीय.