काबुल : तालिबानने (Taliban) अफगाणी सैन्यासह अमेरिकेलाही गुडघे टेकायला लावत राजधानी काबुलसह अफगाणवर (Afghanistan) ताबा मिळवला. मात्र, त्यांना याच अफगाणिस्तानमधील पंजशीर खोऱ्यात (Panjshir Valley) अद्यापही ताबा मिळवता आलेला नाही. उलट या भागावर हल्ला करायला गेलेल्या तालिबान्यांच्या टोळीतील 350 जणांचा स्थानिक नागरिकांनी तयार केलेल्या सैन्याने खात्मा केलाय. याशिवाय 40 जणांना या नागरिकांना जीवंत पकडलं आहे, असा दावा स्थानिक सैन्य असलेल्या नॉर्दन अलायन्सने केलाय. स्थानिक पत्रकारांनीही याबाबत ट्विट करत ही माहिती दिलीय.
तालिबानने सोमवारपासून (30 ऑगस्ट) पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवण्यासाठी हल्ले सुरू केलेत. मात्र नॉर्दन अलायन्सच्या सैनिकांनी तालिबान्यांना चोख उत्तर दिलंय. मंगळवारीही (31 ऑगस्ट) तालिबान्यांनी पंजशीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. तालिबान्यांनी या भागातील एक पूल उद्ध्वस्त करुन नॉर्दन अलायन्सचा इतर पंजशीरपासून संपर्क तोडण्याचाही प्रयत्न केला. जेणेकरुन तालिबानच्या हल्ल्यानंतर त्यांना पळून जाताना रस्ते बंद राहतील. मात्र, हल्ल्यानंतर झालं उलटं. नॉर्दन अलायन्सचे सैनिकांनी तालिबान्यांनाच पळता भुई थोडी केली.
नॉर्दन अलायन्सने ट्विटरवर म्हटलं आहे, “पंजशीरमधील खावकमध्ये मंगळवारी रात्री तालिबानसोबत युद्ध झालं. यात 350 तालिबान्यांना ठार करण्यात आलं. तसेच 40 तालिबान्यांना जीवंत पकडण्यात आलंय. नाटो रिसॉन्स फोर्सला (NRF) या वेळी अनेक अमेरिकन वाहनं, शस्त्रं आणि दारुगोळा बक्षीस म्हणून मिळाला आहे. हे युद्ध खावकचे डिफेन्स कमांडर मुनिब अमिरी (Munib Amiri) यांच्या नेतृत्वात लढण्यात आले.”
So far from battle of Khavak last night, taliban has 350 casualties, more than 40 captured & prisoned. NRF got many new American vehicles, weapons & ammunitions as a trophy. Commanded Defense of Khavak,Commander Munib Amiri ??#AhmadMassoud #Taliban #Panjshir #secondresistance pic.twitter.com/nSlFN47xL2
— Northern Alliance ?? (@NA2NRF) September 1, 2021
स्थानिक पत्रकार नातिक मालिकजादा यांनी पंजशीर युद्धावर ट्विट करत म्हटलं, “अफगाणिस्तानच्या पंजशीरमधील गुलबहार भागात तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्समध्ये चकमक झाली. तालिबानने येथे एक पूल उडवला आहे. हा पूल गुलबहारला पंजशीरशी जोडतो.”
Panjshir Update: Breaking: Intense clashes going on between the Taliban and Resistance Forces in the Golbahar area, the entrance to Panjshir. There are unconfirmed reports that the Taliban blew up a bridge connecting Golbahar road with Panjshir in the clash.
— Natiq Malikzada (@natiqmalikzada) August 31, 2021
पंजशीर खोरं अफगाणिस्तानची राजधानी काबुलपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. पंजशीर खोरं हिंदुकुश पर्वतांच्या जवळ आहे. याच्या उत्तरेला पंजशीर नदी या भागाला उर्वरित अफगाणिस्तानपासून वेगळं करते. पंजशीरचा उत्तर भाग डोंगररागांनी वेढलेला आहे. दक्षिणेला कुहेस्तानची डोंगर रांग या भागाला वेढलेली आहे. या डोंगररांगा वर्षभर बर्फाखाली असतात. यावरुन हा भाग किती दुर्गम आहे हे लक्षात येईल. त्यामुळेच तालिबानला या भागात लढणं अडचणीचं ठरत आहे.
पंजशीर खोरं एकेकाळी शेर अहमद शाह मसूद यांचा गड होता. मात्र, 2001 मध्ये अमेरिकेत अल-कायदाने हल्ला करण्याआधी तालिबान्यांनी शेर अहमद शाह मसूद यांची हत्या केली होती. आता याच शेर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदने तालिबान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. त्याने स्थानिक लोकांना प्रशिक्षित करुन स्थानिक सैन्य उभं केलं आहे. अश्रफ गनी सरकारमधील उप राष्ट्रपती आणि सध्या स्वयंघोषित कार्यवाहक राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह देखील पंजशीरमध्ये मसूद यांच्यासोबत आहेत.
1980 च्या दशकापासून सोव्हिएत संघाचं सरकार असो की 1990 च्या दशकातील तालिबानची सत्ता असो अहमद शाह मसूदने या खोऱ्यावर कुणालाही विजय मिळवू दिलेला नाही. आधी पंजशीर खोरं परवान प्रांताचा भाग होतं. 2004 मध्ये त्याला वेगळ्या प्रांताचा दर्जा मिळाला. या भागात जवळपास 1.5 लाख लोकसंख्या राहते. या भागात ताजिक समूह बहुसंख्य आहे. मे 2021 पासून तालिबानने अफगाणवर हल्ला करत ताबा मिळवायला सुरुवात केली. तेव्हापासून हल्ला झालेल्या भागातील अनेक लोकांनी पंजशीर प्रांतात आसरा घेतला. तेव्हापासून या भागातून तालिबानला कडवट आव्हान निर्माण झालंय.
War in Panjshir 350 Talibani killed 40 captured claim Northern Alliance NRF Afghanistan