काबुल: अफगाणिस्तान सध्या तालिबानच्या ताब्यात आहे. तालिबान सत्तेवर आल्यापासून देशातील परिस्थिती बिकट आहे. आता या संकटातच प्रसिद्ध लाल, रसाळ डाळिंबाचा हंगाम आला आहे. दरवर्षी हजारो टन डाळिंबाची निर्यात अनेक देशांमध्ये केली जाते, मात्र यावर्षी हे डाळिंब सीमेवरच सडत आहे. या दिवसात हजारो टन डाळिंब पाकिस्तानच्या सीमेवर कुजत आहेत. (Why pomegranate from Afghanistan are rotting at shuttered border with Pakistan)
पाकिस्तानच्या सीमेवर डाळिंबाचे ट्रक थांबवण्यात आले आहेत, ज्यामुळे हजारो लोकांचा रोजगारही गेला आहे. लाल दाणे आणि पातळ लाल साल असणारी अफगाणी डाळिंब. या डाळिंबांना जगभर त्याच्यातील आरोग्यदायी गुणांमुळे फायदेशीर मानलं जातं. हे डाळिंब दक्षिण अफगाणिस्तानातील सर्वात महत्वाचे पिकांपैकी एक आहे. तालिबान्यांनी देश ताब्यात घेऊन दोन महिने पूर्ण होणार आहेत. त्यातच ही डाळिंब सुद्धा अफगाणी शेतकऱ्यांच्या अनेक चालू असलेल्या संकटांमध्ये भर टाकत आहेत.
15,000 मजूर बेरोजगार
कंदहारमधील फ्रेश फ्रूट्स युनियनचे प्रमुख हाजी नानी आघा यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, “या भागात 15,000 शेतमजूर आहेत, ज्यांनी व्यवसाय बंद केल्यामुळे नोकऱ्या गेल्या आहेत आणि आता फळंही सडत आहेत.” अगदी खरबुजांच्या आकाराची ही डाळिंब इथं पोत्यांमध्ये भरुन देशाविदेशात पाठवण्याचं काम होत होतं.
हे ट्रक लवकरच अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरच्या स्पिन बोल्डककडे रवाना होतील. पण त्यांच्या आधी गेलेल्या अनेक ट्रकचा प्रवास तिथेच संपला होता. पाकिस्तानने आपल्या शेजारील देशाशी व्यापार वाढवण्यासाठी आयात केलेल्या फळांवरील विक्री कर काढून टाकला आहे, पण, सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामान्य अफगाणांसाठी निर्बंध कडक केले आहेत.
लोकांना बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्यापासून रोखण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. यामुळे पाकिस्तानी अधिकारी आणि अफगाणिस्तानचे नवे राज्यकर्ते यांच्यात एक प्रकारची युद्धाला सुरुवात झाली आहे.
अनेक व्यापारी मार्ग बंद
तालिबानने निषेध म्हणून अनेक वेळा सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळं शेकडो टनांचा माल लादलेले हे ट्रक आठवडेच्या आठवडे सीमेवरच उभे राहिले, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. “संपूर्ण अफगाणिस्तानसाठी ही शोकांतिका आहे, कारण संपूर्ण अफगाणिस्तानचा व्यापार या सीमेवरून होतो.” साधारणपणे 40,000 ते 50,000 टन उत्पादनं या सीमेद्वारे पाकिस्तानला निर्यात केली जातात. भारताला अफगाणिस्तानातूनही डाळिंब मिळते, गेल्या पाच वर्षांत अफगाण डाळिंबाची आयात वाढली होती, पण तालिबानच्या येण्यानं हे सगळं थांबलं आहे.
कंदहारच्या चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य अब्दुल बाकी बीना म्हणाले की, आतापर्यंत केवळ 4,490 टन माल देशाबाहेर गेला आहे. ते म्हणतात की, हा माल विकण्याची वाट पाहत आहे, पण जितका जास्त वेळ लागेल तितकी त्यांची गुणवत्ता खराब होईल आणि त्यांचे मूल्यही कमी होईल.
अफगाणिस्तानचे कृषी क्षेत्राला आधीच दुष्काळाने ग्रहण लागलं आहे. त्यातच 2 महिन्यापूर्वीपासून सुरु असलेल्या हिंसाचारामुळे सगळं काही थांबले होतं. त्यातच आधी पाश्चिमात्य पाठिंबा आणि आंतरराष्ट्रीय अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अवैध अफूची लागवड बंद केली, आणि डाळिंबाचा पर्याय निवडला. पण तालिबान सत्तेत आल्यानंतर पुन्हा सगळी गणितं बदलली आहेत.
हेही वाचा: