Pakistan Air Strike in Afganistan | अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानने एअर स्ट्राइक केला. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने सोमवारी 18 मार्चला अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले. पाकिस्तानच्या या एअर स्ट्राइकचा तालिबानने बदला घेतला आहे. पाकिस्तानला त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलय. तालिबानी सैन्याने पाकिस्तानच्या सैन्य चौक्यांना लक्ष्य केलं. जोरदार बॉम्बफेक आणि गोळीबार केला. पाकिस्तान-अफगानिस्तान सीमेवर डूरंड लाइन बुर्कीमध्ये तालिबानी सैन्याने गोळीबार आणि बॉम्बफेक केली. यात तीन पाकिस्तानी सैनिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये सीमेवर रक्तरंजित संघर्ष झाला.
तालिबानच्या नेतृत्वाखालील संरक्षण मंत्रालयाच म्हणण आहे की, “पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तालिबानी सैन्याने पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केलं. अफगाणिस्तानच्या संरक्षणासाठी आमच सैन्य कुठल्याही आक्रमक कारवाईला उत्तर देण्यासाठी तयार आहे. कुठल्याही परिस्थितीत क्षेत्रीय अखंडता कायम राहिली पाहिजे”
‘गंभीर परिणाम भोगावे लागतील’
पाकिस्तानच्या फायटर जेट्सनी अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून पक्तिक प्रांतात बरमेल जिल्ह्यात आणि खोस्त प्रांताच्या सेपेरा जिल्ह्यात नागरिकांच्या घरावर बॉम्बफेक केली. यात महिला आणि मुलांसह कमीत कमी आठ जणांचा मृत्यू झाला. यात पाच महिला आणि तीन मुलं आहेत. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने पाकिस्तानला इशारा दिला. अफगाणिस्तानच्या संप्रभुतेच उल्लंघन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील.
हवाई हल्ल्यात कुठला कमांडर ठार?
पाकिस्तानात अलीकडे दहशतवादी हल्ले झाले. त्यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीवरुन हे हल्ले झाल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. तालिबानने पाकिस्तानचा हा आरोप फेटाळून लावलाय. पाकिस्तानी मीडियानुसार, अफगान क्षेत्रात पाकिस्तान केलेल्या हवाई हल्ल्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चा कमांडर अब्दुल्ला शाह ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता. कमांडरने नंतर एक वीडियो जारी करुन तो दक्षिण वजीरिस्तानमध्ये असल्याचा दावा केला.