लेबनॉनमध्ये पेजर स्फोटानंतर आता वॉकीटॉकीमध्ये स्फोट, 3 ठार; अनेक जखमी

| Updated on: Sep 18, 2024 | 9:48 PM

लेबनॉनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी स्फोट होत आहेत. मंगळवारी पेजरमध्ये स्फोट होत होते, तर आज सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोट होत आहेत. यामध्ये लॅपटॉप, वॉकीटॉकी आणि मोबाईलचाही समावेश आहे. अनेक शहरांमध्ये अशा घटना उघडकीस आल्या आहेत.

लेबनॉनमध्ये पेजर स्फोटानंतर आता वॉकीटॉकीमध्ये स्फोट, 3 ठार; अनेक जखमी
Follow us on

लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या सैनिकांच्या पेजरमध्ये झालेल्या स्फोटानंतर बुधवारी पुन्हा एकदा अनेक स्फोट झाले आहेत. इस्रायलने यावेळी त्यांच्या वॉकीटॉकींना लक्ष्य केले आहे. या स्फोटात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अनेक जण जखमी झालेत. हिजबुल्लाहने वापरलेल्या वॉकी-टॉकीज आणि रेडिओ सेटचा बुधवारी दुपारी लेबनॉनच्या दक्षिणेकडील आणि बेरूतच्या दक्षिण उपनगरात स्फोट झाला, असे सांगण्यात येत आहे. पेजर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार केले जात असताना स्फोट झाला. वॉकीटॉकीमधील स्फोटाचा व्हिडिओही समोर आला आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी मोठी गर्दी दिसून येते. दरम्यान, अचानक स्फोट होतो, त्यानंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होते. हा स्फोट वॉक-टॉकीमध्ये झाला. पेजर्सप्रमाणे ही उपकरणेही पाच महिन्यांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती.

एका दिवसाआधी हिज्बुल्लाच्या सैनिकांनी वापरण्यात आलेल्या पेजरचा लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे सर्वत्र गोंधळ उडाला होता. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 2700 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचा संशय आहे. मात्र, इस्रायलने हे अद्याप स्वीकारलेले नाही. इस्रायलच्या लष्कराने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

लेबनॉनने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने मंगळवारच्या स्फोटांपूर्वी हिजबुल्लाहने खरेदी केलेल्या पेजरमध्ये स्फोटके पेरली होती. असा आरोप केला होता. लेबनॉनचे आरोग्य मंत्री फिरास अबियाद यांनी बुधवारी सांगितले की, मंगळवारच्या स्फोटातील मृतांची संख्या दोन मुलांसह 12 झाली आहे. या हल्ल्यात अतिरेकी गटातील अनेक लढवय्ये आणि बेरूतमधील इराणच्या राजदूतासह सुमारे 3,000 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी पेजर स्फोटाशी संबंधित घटनांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पेजर कोणत्या कंपनीने बनवले?

ज्या पेजरमध्ये बॉम्बस्फोट झाले ते हंगेरियन कंपनीने बनवले होती अशी माहिती आहे. पण तैवानची कंपनी गोल्ड अपोलो याचा ब्रँड वापरण्यात आला होता. बुधवारी कंपनीने ही माहिती दिलीये. गोल्ड अपोलोने सांगितले की बुडापेस्ट-आधारित दुसऱ्या कंपनीने हे पेजर तयार केले होते, ज्याने पेजर्सवर त्याचा अधिकृत ब्रँड वापरण्याचा अधिकार दिला होता. पुरवठा करण्यापूर्वीच या पेजर्समध्ये स्फोटक पदार्थ टाकण्यात आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने अमेरिकेला माहिती दिली होती. पेजरमध्ये थोड्या प्रमाणात स्फोटक लपवले होते आणि नंतर त्याचा स्फोट करण्यात आला.

गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी गट हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर हिजबुल्ला आणि इस्रायली सैन्यामध्ये संघर्ष सुरु झाला होता. लेबनॉनमध्ये गोळीबार आणि हल्ल्यांमध्ये शेकडो लोक मारली गेलीत. तर इस्रायलमध्येही डझनभर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या संघर्षात सीमेच्या दोन्ही बाजूंनी हजारो लोक विस्थापित झाले आहेत. तणाव असूनही, दोन्ही बाजूंनी आतापर्यंत काळजीपूर्वक युद्ध टाळले आहे, परंतु इस्त्रायली नेत्यांनी अलिकडच्या आठवड्यात अनेक इशारे जारी केले आहेत की ते लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह विरुद्ध कारवाई करू शकतात.