Boycott Maldives | भारताच्या शक्तीची दखल न घेणं, मोहम्मद मोइज्जू यांना भारी पडू शकतं. भारताबरोबर संबंध खराब झाल्याने तिथला विरोधीपक्ष मालदीव सरकारवर आधीच नाराज आहे. आता बातमी अशी आहे की, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु आहे. संसदीय अल्पसंख्यक नेता अली अजीम यांनी मोहम्मद मोइज्जू यांना राष्ट्रपती पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. मोइज्जू यांना सत्तेतून हटवण्यासाठी मदत करा, असं त्यांनी मालदीवच्या नेत्यांना अपील केलय. आमची मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टी (MDP) मालदीवच परराष्ट्र धोरण स्थिर ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे, असं अली अजीम यांनी म्हटलय. आम्ही कुठल्याही शेजारी देशाला परराष्ट्र धोरणात बदल करु देणार नाही. मोहम्मद मोइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी तयार आहात का? असं त्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारलय.
भारताशी पंगा घेणं मालदीवला महाग पडताना दिसतय. मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक आपल बुकिंग रद्द करत आहेत. ट्रॅव्हल कंपन्यांच्या विरोधानंतर मालदीवच्या टूरिजम असोशिएशनने सुद्धा आपल्या मंत्र्यांच्या वक्तव्याची निंदा केलीय. मालदीव एसोसिएशन ऑफ टूरिज्म इंडस्ट्री (MATI) ने एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलय. भारताचे पंतप्रधान आणि भारतीय जनतेविरुद्ध आमच्या मंत्र्यांनी जी वक्तव्य केली, त्याची आम्ही निंदा करतो, असं MATI ने म्हटलं आहे.
मालदीवच्या टूरिजम असोशिएशनने काय म्हटलय?
“भारत आमचा जवळचा सहकारी आणि शेजारी देश आहे. इतिहासात आमचा देश जेव्हा कधी संकटात सापडला, तेव्हा सर्वप्रथम भारतानेच मदत केलीय. आमच्यासोबत इतके घनिष्ठ संबंध बनवल्याबद्दल आम्ही सरकारसोबतच भारतीय जनतेचे आभारी आहोत. मालदीवच्या टूरिजम क्षेत्रात भारताची महत्त्वाची भूमिका राहिलीय. कोविड-19 नंतर आमच्या टूरिजम सेक्टरला बाहेर येण्यास मदत झालीय. मालदीवसाठी भारत एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे” असं मालदीवच्या टूरिजम असोशिएशनने म्हटलं आहे.
‘भारताची माफी मागितली पाहिजे’
भारतीय पंतप्रधानांच्याविरोधात वक्तव्य केल्यानंतर मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब यांचही वक्तव्य आलय. भारताची माफी मागितली पाहिजे असं अहमद अदीब यांनी म्हटलय. राष्ट्रपति मुइज्जू यांनी पंतप्रधान मोदींशी बोलून या राजकीय संकटातून मार्ग काढला पाहिजे असं अदीब यांनी म्हटलय.