AI म्हणजे अमेरिका- इंडिया पॉवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला नवा अर्थ

| Updated on: Sep 22, 2024 | 11:13 PM

भारत आता संधीचा अड्डा बनला आहे. आता भारतात संधीची वाट पाहावी लागत नाही. उलट भारत संधी निर्माण करत आहे. देशात असंख्य अशी कामे झालीत की त्यामुळे लोकांनी गरीबीला पराभूत केलंय. गरिबीतून बाहेर पडणं मध्यमवर्गीय भारताचा विकास राहिला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

AI म्हणजे अमेरिका- इंडिया पॉवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला नवा अर्थ
PM Modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नवीन अर्थ सांगितला आहे. एआयचा अर्थ केवळ आर्टिफिशियल्स इंटेलिजन्स नाही तर अमेरिका- इंडिया पॉवर आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतात तिसऱ्यांदा आमचं सरकार आलं आहे. या विजयाचं प्रचंड मोठं महत्त्व आहे. आपल्याला तिसऱ्या टर्ममध्ये अनेक गोष्टी करायच्या आहेत, असं मोदी यांनी स्पष्ट केलं.

न्यूयॉर्क येथील लॉन्ग आयलँडच्या नासाऊ कोलेजियममध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिवासी भारतीयांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी हा नवीन अर्थ सांगितला. यावेळी मोदींनी अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांचं कौतुक केलं. तुम्ही लोकांनी भारताचं नाव उंचावलं आहे. तुम्ही सर्वजण भारताचे ब्रँड अम्बेसेडर आहात. भारतमातेने जे आपल्याला शिकवलं ते आपण कधीच विसरू शकत नाही. तुम्ही भारताला अमेरिकेशी आणि अमेरिकेला भारताशी कनेक्ट केलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

भारतीयांचं कौतुक ऐकतो

मी जगात जिथे जातो तिथे केवळ भारतीयांचं कौतुक ऐकत असतो. राष्ट्रपती बायडेन यांच्या घरी गेलो होतो. हा सन्मान देशातील 140 कोटी लोक आणि तुमचा आहे. मी बायडेन यांचे आभार व्यक्त करतोच. पण तुमचेही आभार व्यक्त करतो, असं मोदी म्हणाले.

लोकशाहीचा स्केल पाहिला तर…

भारतात निवडणुका झाल्या आहेत. अमेरिकेत निवडणुका होणार आहेत. भारताच्या लोकशाहीची स्केल पाहिली तर अभिमान वाटतो. तीन महिन्यात पोलिंग प्रोसेस, 1.5 कोटी लोकांचा पोलिंग स्टाफ, अडीच हजार राजकीय पक्ष, 8 हजाराहून अधिक उमेदवार, शेकडो न्यूज चॅनल्स. लाखो सोशल मीडिया हे सर्व भारताच्या लोकशाहीला अधिक मजबूत करत आहेत, असं मोदी यांनी सांगितलं.

कधी वाटलं नव्हतं…

माझ्या आयुष्यात मी खूप फिरलो आहे. प्रत्येक ठिकाणचा अनुभव घेतला आहे. मी वेगळ्याच मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला होता. पण नियतीने मला राजकारणात आणून सोडलं. मुख्यमंत्री होईल असं कधी वाटलं नव्हतं. पण 15 वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो. त्यानंतर जनतेने प्रमोशन करून पंतप्रधान केलं. त्याचाच परिणाम म्हणून एवढं यश मिळालं आहे. अत्यंत विश्वासाने लोकांनी मला तिसरी टर्म दिली आहे. त्यामुळेच मी या टर्ममध्ये अधिक जबाबदारीने पुढे जात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुष्प लक्षात ठेवा

तिसऱ्या कार्यकाळात अनेक लक्ष्य गाठायची आहेत. तिप्पट ताकद आणि शक्तीने पुढे जायचं आहे. पुष्प शब्द लक्षात ठेवा. P-प्रगतिशील भारत, U-अजय भारत, S-आध्यात्मिक भारत, H-समाजासाठी कटिब्ध भारत, P-समृद्ध भारत. आम्ही पुष्पाच्या पाच पाकळ्या एकत्रित करून विकसित भारत निर्माण करणार आहोत, असंही ते म्हणाले.