काबुल : अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या आपल्या मोहिमेचा वेग वाढवलाय. अफगाणिस्तानमधून मागील 24 तासात जवळपास 19 हजार लोकांना एअरलिफ्ट करण्यात आलं आहे, अशी माहिती पेंटागनमधील अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलीय. अमेरिकन सैन्याचे मेजर जनरल विलियम हँक टेलर म्हणाले, “अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या ताब्यानंतर आतापर्यंत 88 हजार लोकांना काबुलमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय.”
मेजर जनरल विलियम हँक टेलर म्हणाले, “आमच्या मिशनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आम्ही सध्या अमेरिकेच्या अध्यक्षांचे आणि संरक्षण सचिवांच्या आदेशाचे पालन करत आहोत. अफगाणिस्तानच्या काबुल एअरपोर्टवर अमेरिकेचे सैनिक सुरक्षा व्यवस्था सांभाळत आहेत. तेथे कडेकोट सुरक्षा आहे. 20 ऑगस्टनंतर अमेरिका आणि युरोपीयन मोहिमेत जवळपास 10,000 अफगाणी नागरिकांनाही बाहेर पडण्यास मदत करण्यात आलीय.”
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले, “अफगाणिस्तानची राजधानी काबुलहून अमेरिकी आणि इतर हजारो लोकांना हवाई मार्गाने बाहेर काढण्याचं कठिण काम वेगान सुरू आहे.” असं असलं तरी बायडन यांनी हे मदत कार्य केवळ 31 ऑगस्टपर्यंतच चालणार असल्याचं स्पष्ट केलं. याला कोणतीही मुदतवाढ नसेल हेही नमूद केलं.
पेंटागनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी अफगाणमधील मदत मोहिमेचा आराखडा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका अफगाणमधील अमेरिकन सैन्य, संसाधनं आणि उपकरणांना प्राधान्य देणार आहे. शक्य तितक्या जास्त गोष्टी संरक्षित करण्यावर अमेरिकेचा भर असणार आहे.