बांग्लादेशात शेख हसीना सरकार कोसळलय. त्यांनी देश सोडलाय. वरकरणी मागच्या एक महिन्यापासून बांग्लादेशात आरक्षण विरोधी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे हे घडलय असं दिसतय. पण बांग्लादेशातल्या घडामोडींच विश्लेषण केलं, तर अजून बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. निशस्त्र आंदोलकांनी महिन्याभरापेक्षा कमी कालावधीत एक मजबूत सरकार पाडलं, यावर विश्वास ठेवण कठीण आहे. मागच्या काही वर्षातील घटनाक्रमावर नजर टाकली, तर बांग्लादेशवर अमेरिकेच बारीक लक्ष होतं. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, “अमेरिका बांग्लादेशच्या लोकांसोबत आहे. अमेरिकेने शेख हसीना यांच्या राजीनाम्याच स्वागत केलय. अंतरिम सरकार स्थापनेसाठी सर्व पक्षांना पुढे येण्याच आवाहन केलय”
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच हे वक्तव्य हैराण करणारं आहे. कारण एका पंतप्रधानाला अशा पद्धतीने सत्तेतून बेदखल करणं लोकशाही मुल्याच्या विरोधात मानलं जातं. यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की, अमेरिकेच शेख हसीन यांच्याबरोबर जमत नव्हतं का?. “अमेरिकेला म्यानमार आणि बांग्लादेशच्या भूमीवरुन एक ख्रिश्चन राष्ट्र बनवायच आहे. अमेरिकेला बांग्लादेशात मिलिट्री बेस बनवायचा आहे. तो बनवायला परवानगी देत नसल्याने सरकार पाडण्याची आणि देश तोडण्याची धमकी मिळतेय” असा दावा शेख हसीना यांनी मे महिन्यात केला होता. शेख हसीना यांचं हे विधान सध्याच्या परिस्थितीशी जुळणार आहे.
अमेरिकेची कशावर नजर होती?
शेख हसीना यांची अवामी लीग पार्टी मागच्या 15 वर्षांपासून बांग्लादेशमध्ये सत्तेत आहे. 2024 च्या सुरुवातीला निवडणूक झाली. त्यात बांग्लादेशातील मुख्य विरोधी पक्ष बांग्लादेश नॅशनल पार्टीने सहभाग घेतला नव्हता. शेख हसीना निवडणुकीत गडबड करतायत, विरोधी पक्षाच्या लोकांना तुरुंगात टाकतायत असा विरोधी पक्षांचा आरोप होता. जानेवारी महिन्यात अमेरिकेने निष्पक्ष निवडणूक घेण्याची मागणी केली होती. अमेरिकेची बांग्लादेशच्या निवडणुकीवर नजर होती.
त्याला हवा देण्याच काम अमेरिकेने केलं
बांग्लादेशच्या राजकारणात अमेरिकेच्या हस्तक्षेपाची चीनने जाहीर निंदा केली होती. भारताने सुद्धा हसीना सरकारवर दबाव टाकू नका असा आग्रह केला होता. बांग्लादेशात स्वतंत्र निवडणुका झालेल्या नाहीत, असं अमेरिकेने जाहीरपणे म्हटलं होतं. बांग्लादेशात विरोधी पक्षांमध्ये जो राग धुमसत होता, त्याला हवा देण्याच काम अमेरिकेने केलं होतं.
भारताने अमेरिकेला काय सांगितलेलं?
भारताने अमेरिकेला हे सुद्धा सांगितलं होतं की, ‘शेख हसीना यांचा पराभव म्हणजे बांग्लादेशचा कल चीनच्या बाजूला झुकेल’ कारण बांग्लादेश नॅशनल पार्टीचा कल पाकिस्तान आणि चीनच्या बाजूला जास्त आहे. हसीना यांच्या पतनानंतर बांग्लादेश बाबत भारताची चिंता वाढली आहे.
CIA च्या माजी अधिकाऱ्याने काय खुलासा केलेला?
बांग्लादेश नॅशनल पार्टी देशातील निवडणूक प्रक्रियेला बदनाम करण्याचा शक्य तो सर्व प्रयत्न करत आहे. BNP अमेरिकेच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप शेख हसीना सरकारने केला होता. आपल्या हितासाठी अन्य देशातील क्रांती भडकवणं अमेरिकेच्या रणनितीचा भाग आहे असं CIA च्या एका माजी अधिकाऱ्याने ‘स्पुतनिक इंडिया’ला सांगितलेलं. यात विद्यमान सरकारला बदनाम करणं अनिवार्य आहे. बांग्लादेशातील राजकारणात अमेरिकेच्या हस्तक्षेपावर बोलताना लॅरी जॉनसन यांनी हा खुलासा केला होता.
अमेरिकेला बांग्लादेशातील सत्तापालटाचा काय फायदा होणार?
कुठल्याही देशातील सत्तापालटात अमेरिकेच नाव पहिल्यांदा आलेलं नाही. देशातील नेते, शासकांना हुकूमशाह ठरवून त्यांच्या विरोधात प्रदर्शन भडकवण्याचा अमेरिकेचा मोठा इतिहास आहे. हसीना यांच्या कार्यकाळात बांग्लादेशचे संबंध भारत, चीन आणि रशियासोबत सुधारले आहेत. भारत आणि चीन बांग्लादेशचे मोठे ट्रेड पार्टनर आहेत. अशा स्थितीत या क्षेत्रात आपली पकड मजबूत करतान अमेरिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. रशियासोबत आपली वाढती जवळीक अमेरिकेला खटकतेय असा सुद्धा बांग्लादेशने दावा केला होता. भारत, चीन, रशियापेक्षा अमेरिकेला प्राधान्य देणारं सरकार बांग्लादेशात सत्तेवर आलं, तर अमेरिकेला दक्षिण आशियात मिडिल ईस्टप्रमाणे आपली पकड मजबूत करायची आहे.