पाकिस्तानात सध्या भारत विरोधी दहशतवाद्यांना वेचून-वेचून संपवलं जातय. त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच वक्तव्य केलं होतं. त्यावर अमेरिकेने थेट प्रतिक्रिया देण टाळलं आहे. भारत-पाकिस्तानला आम्ही तणाव टाळण्यासाठी प्रोत्साहन देऊ तसेच चर्चेच्या माध्यमातून त्यांनी तोडगा काढवा एवढच अमेरिकेने म्हटलं आहे. याआधी अशा विषयात अमेरिकेकडून भारताला सल्ले दिले जायचे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये एकप्रकारचा तो हस्तक्षेप ठरायचा. “आम्ही या मध्ये पडणार नाही. पण भारत-पाकिस्तानला तणाव टाळण्यासाठी प्रोत्साहन देऊ. त्यांनी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न मिटवावा” एवढच अमेरिकेने म्हटलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर हे पत्रकार परिषदेत म्हणाले.
पाकिस्तानात सध्या ज्या दहशतवाद्यांना मारलं जातय, त्यात भारताचा हात आहे, असा आरोप पाकिस्तानकडून केला जातोय. पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंह यांचं वक्तव्य म्हणजे कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या करण्यात आली, त्याची कबुली आहे का? या प्रश्नावर मिलर म्हणाले की, ‘अमेरिका यामध्ये पडणार नाही’. भारताविरोधात निर्बंधाचा तुम्ही का विचार करत नाही? यावर मिलर म्हणाले की, “तुम्ही निर्बंधांबद्दल मला विचारता, पण हा असा विषय आहे, ज्यावर मोकळेपणाने बोललं जाऊ शकत नाही”
‘आम्ही तिथे जाऊन त्याला संपवू’
11 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भाजपा सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात दहशतवाद्यांना त्यांच्या घरात मारलं जातय” या महिन्याच्या सुरुवातीला राजनाथ सिंह सुद्धा म्हणाले होते की, “दहशतवाद्यांनी भारतातील शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला किंवा दहशतवादी कारवाया केल्या, तर त्यांना तसच प्रत्युत्तर दिलं जाईल. कोणी पाकिस्तानात पळून गेला, तर आम्ही तिथे जाऊन त्याला संपवू” भारतीय गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्या घडवत आहेत, असा दावा ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वर्तमानपत्राने केला होता. त्यावर भाष्य करताना राजनाथ सिंह यांनी वरील वक्तव्य केलं होतं.