अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात या प्राणघातक हल्ल्यातून बचावले. त्यांच्या कानाला चाटून गोळी गेली. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कोण आहे? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामागे इराणच कारस्थान असल्याच अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर या विषयी प्रतिक्रिया दिली. ‘इराणने माझी हत्या केली, तर अमेरिकेने इराणला संपवलं पाहिजे’ असं ट्रम्प म्हणाले.
“जर, त्यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांची हत्या केली, तर अमेरिका इराणला जगाच्या नकाशावरुन मिटवून टाकेल अशी अपेक्षा आहे. जर, असं झालं नाही, तर अमेरिकी नेते घाबरट समजले जातील” असं ट्रम्प म्हणाले. अलीकडेच अमेरिकेत एका प्रचारसभेत ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दोघे जखमी झाले. या हल्ल्यामागे इराण असल्याच अजून स्पष्ट झालेलं नाहीय. इराणने सुद्धा त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.
त्यानंतर बदल्याची भाषा, धमकी
ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असताना 2018 मध्ये, त्यांनी माजी राष्ट्रपती ओबामा यांच्या कार्यकाळात इराणबरोबर झालेला JCPAO न्यूक्लियर करार मोडला होता. त्याचा इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. 2020 मध्ये अमेरिकी ड्रोनच्या हल्ल्यात कासिम सुलेमानीची हत्या करण्यात आली. त्यानंतर अमेरिका आणि इराणमधील मतभेद, वाद आणखी वाढले. इराणने सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील सदस्यांना अनेक धमक्या दिल्या. जानेवरी 2022 मध्ये इराणचे माजी राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी ट्रम्प यांच्याविरोधात इंटरनॅशनल कोर्टमध्ये केस चालवण्याची मागणी केली होती.