मागच्या अडीच वर्षांपासून सुरु असलेलं रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारताची भूमिका महत्त्वाची ठरु शकते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर युद्धा थांबवण्याचा शब्द डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांना लवकरच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटायचं आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सुद्धा या भेटीची इच्छा व्यक्त केलीय. पण प्रश्न हा आहे की, ही ऐतिहासिक भेट कुठे होईल? सूत्रांच्या माहितीनुसार, क्रेमलिनकडून त्या देशांची यादी बनवण्याचं काम सुरु झालय, जिथे ही भेट होऊ शकते. त्यात भारताच नाव सुद्धा आहे. क्रेमलिनशी संबंधित अनेकांच म्हणणं आहे की, भारतात ही भेट यशस्वी होऊ शकते.
भारताने रशिया-युक्रेन युद्धात निष्पक्ष आणि स्वतंत्र भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या भूमिकेच कौतुक झालं. सोबतच 2025 मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा भारत दौरा प्रस्तावित आहे. दुसऱ्याबाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा आपल्या पहिल्या कार्यकाळात भारताचा दौरा केला आहे.
दोन्ही शक्तीशाली नेते यावर्षी येणार भारतात
भारत क्वाडचा सदस्य आहे. 2025 मध्ये भारत QUAD सम्मेलनाचा अध्यक्ष असणार आहे. त्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष येणार आहेत. यावर्षी रशिया आणि अमेरिका दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष भारतात येतील. भारताच्या कुटनितीक भूमिकेमुळे एका आदर्श स्थिती तयार होऊन शांततेची अपेक्षा करु शकता.
स्लोवाकिया सुद्धा शर्यतीत
23 डिसेंबरला स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फीको यांनी रशियाचा दौरा केला. त्यांनी पुतिन यांना आपल्या देशात येण्याचं निमंत्रण दिलं. क्रेमलिनशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, रशिया अशा एका मित्र देशाच्या शोधात आहे, जिथे ही भेट सहजतेने होईल.
युद्धानंतर पुतिन यांनी कुठल्या देशांचा दौरा केलाय?
युद्धानंतर पुतिन यांनी फक्त त्या देशांचा दौरा केला आहे, जे रशियाचे मित्र म्हणून ओळखले जातात. यात चीन, मंगोलिया, वियतनाम, बेलारूस, कजाकस्तान आणि उत्तर कोरिया हे देश आहेत. आयसीसीच्या अटक वॉरंटनंतर पुतिन यांचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करण्यात आला होता.
याआधी कुठे भेट झालीय?
अमेरिका आणि रशियन राष्ट्राध्यक्षांची बैठक बहुतांशवेळा युरोपात होते. 2021 साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि पुतिन यांची भेट जिनेवा येथे झाली होती. विद्यमान स्थितीत डोनाल्ड ट्रम्प युरोपच्या काही देशात जाणं टाळत आहेत.
भारताचा फायदा काय?
रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीबाबत भारतात भेट झाली, तर ती खूप मोठी बाब असेल. यामुळे भारताच्या कुटनितीला एक वेगळी उंची, प्रतिष्ठा मिळेल. आता फक्त क्रेमलिनकडून याला अधिकृत दुजोरा मिळाला पाहिजे.