नवी दिल्ली : भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू लवकरच भारतात परतणार आहे. टीवी 9 भारतवर्षशी बोलताना स्वत: अंजूने ही माहिती दिली. राजस्थानात राहणारी अंजू काही महिन्यांपूर्वी नवऱ्याला आणि मुलांना सोडून पाकिस्तानात गेली. पाकिस्तानात जाऊन तिने प्रियकर नसरुल्लाहसोबत निकाह केला. फेसबुकवरुन दोघांची ओळख झाली होती. पुढे ओळखीच रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर अंजूने भारत सोडून थेट पाकिस्तान गाठलं. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. अंजूचा पाकिस्तानातील व्हिसा वाढवण्यात आला. सध्या ती तिथेच आहे. लवकरच ती भारतात येईल. सीमा हैदरनंतर अंजूची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली. सीमा हैदर भारतीय प्रियकरासाठी पाकिस्तानसोडून भारतात आली, तर अंजू भारतातून पाकिस्तानात गेली.
अंजूने सांगितलं की, “तिची तब्येत चांगली नाहीय. ताप आल्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही” लवकरच भारतात परतणार असल्याच तिने सांगितलं. आता पाकिस्तानात असताना तिला आपल्या मुलांची भरपूर आठवण येतेय. मुलांशी जास्त बोलण होत नसल्याच अंजूने सांगितलं. अंजूला 2 मुलं आहेत. यात मुलगी एंजेल नवरा अरविंदजवळ आहे. मुलगा अंजूचे वडिल प्रसाद थॉमस यांच्यासोबत मध्य प्रदेशात राहतो. अंजूचा नवरा अरविंदने ही माहिती दिली.
अंजूचे वडिल काय म्हणाले?
अंजूचे वडिल प्रसाद थॉमस म्हणाले की, “ती माझ्यासाठी आणि मी तिच्यासाठी मेलोय. जिवंत लोकांना आपण भेटतो. ती माझ्याकडे येणार नाही आणि मी तिच्याकडे जाणार नाही. मला या विषयावर बोलायचच नाहीय” अंजू पाकिस्तानात गेल्यानंतर माध्यमांमध्ये तिची बरीच चर्चा होती. सोशल मीडियावर तिचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ चर्चेत असायचा. सोशल मीडिच्या माध्यमातून ती अपडेट द्यायची. अंजूने पाकिस्तानात नसरुल्लाहसोबत निकाह केल्यानंतर तिला बऱ्याच भेटवस्तू देण्यात आल्या. दोघांचे हॉटेलमधील डिनरचे, फिरण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.