मालदीव आणि भारत यांच्यात गेल्या काही वर्षात चांगले संबंध होते. पण मालदीवमधील सरकार बदलल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडले. चीनने याचा फायदा उचलला. आता चीनने आणखी एका देशाला जवळ करायला घेतले आहे. तो देश म्हणजे इंडोनेशिया. दोन्ही देशातील जवळीक पुन्हा वाढू लागली आहे. इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी सत्ता हाती घेताच आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यात चीनला पोहोचले आहेत. रविवारी दोन्ही देशांमध्ये 10 अब्ज डॉलर्सचा करार झालाय. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनीही शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा चीनचा दौरा केला होता. पण चीनकडून काही अपेक्षित मदत न मिळाल्याने त्यांना भारताचे महत्त्व कळाले.
इंडोनेशिया आणि चीन हे दोन्ही आता मोठे भागीदार झाले आहेत. चीनने आता इंडोनेशियामध्ये 7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलीये. इंडो-पॅसिफिक प्रदेशात असलेला इंडोनेशिया हा भारत आणि चीन दोघांसाठी महत्त्वाचा आहे. चीनने सत्तापरिवर्तनानंतर इंडोनेशियाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे.
इंडोनेशियामध्ये सत्तापरिवर्तन झाले असून तेथे ही चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो सत्तेत आले आहेत. प्राबोवो यांचे जिनपिंग यांनी सर्वात आधी अभिनंदन केले. जिनपिंग यांनी इंडोनेशियाशी सामरिक संबंध दृढ करण्यावर भर दिला होता. राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यानंतर लगेच दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर पोहोचले.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी संबंध दृढ करण्यावर भर दिला. पुढील वर्षी प्रथमच चीन आणि इंडोनेशिया यांच्यात परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची संयुक्त बैठक होणार आहे.
राष्ट्राध्यक्ष प्राबोवो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ‘इंडोनेशिया आणि चीन परस्पर मैत्री मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या समृद्धीसाठी वचनबद्ध आहेत.’
ते म्हणाले की, या आधुनिक काळात शांतता आणि समृद्धीचा मार्ग एकमेकांचा विरोध नसून सहकार्याचा आहे. इंडोनेशियाच्या नवीन राष्ट्राध्यक्षांचे सर्वात महत्वाचे प्राधान्य म्हणजे अर्थव्यवस्था आणि संरक्षण प्रकरणे, ज्यामुळे त्यांच्या परदेश दौऱ्यात चीन आणि अमेरिका या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांचा समावेश आहे.
इंडोनेशियन राजकीय संशोधक डॉ. अहमद रिझकी मर्धातिल्ला उमर म्हणतात की ‘प्राबोवो या दोन क्षेत्रांमध्ये संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, एकीकडे त्याला चीनचा व्यापार आणि गुंतवणूक मजबूत करायची आहे आणि दुसरीकडे त्याला संरक्षण आधुनिकीकरणासाठी अमेरिकेसोबत काम करायचे आहे.