सीमा वादामुळे भारत-चीन संबंध मागच्या तीन-चार वर्षात बिघडले. अजूनही या संबंधात सुधारणा झालेली नाही. परस्परांबद्दल अविश्वासाची भावना कायम आहे. भारत-चीन सीमेवर स्थिती सामान्य झालेली नाही. तणाव कायम असून दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती आहे. चीनच्या कुठल्याही अरेरावीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सुसज्ज आहे. या दरम्यान चीनने एक मोठा दावा केला. जो खुद्द अमेरिकेनेच फेटाळून लावला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग असून नियंत्रण रेषेजवळ कुठलही अतिक्रमण मान्य नाही, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. त्याआधी नुकताच चीनने अरुणाचल प्रदेश आपला भूभाग असल्याचा दावा केला होता.
“अरुणाचल प्रदेश हा भारतात भूभाग आहे. लष्करी किंवा नागरी वस्तीच्या माध्यमातून घुसखोरी किंवा अतिक्रमण करुन एकतर्फी स्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे याला आमचा विरोध आहे” असं अमेरिकेने म्हटलय. अरुणाचल प्रदेश भारताने बेकायदरित्या मिळवला असून हा चीनचा भूभाग आहे असा दावा चीनच्या लष्कराने केला होता. भारताने अरुणाचल प्रदेशमध्ये सिला टनेल बांधलाय. यामुळे भारतीय सैन्याला वेगाने हालचाली करता येतील. रणनितीक दृष्टीने हे महत्त्वाच पाऊल आहे म्हणून चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवर दावा सांगितला.
भारताने चीनला काय प्रत्युत्तर दिलं?
भारतीय नेते मंडळी जेव्हा-जेव्हा अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा-तेव्हा चीनकडून विरोध केला जातो. चीनने या भागाला झंगनान असं नाव दिलय. पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल दौऱ्यावर गेले होते. त्यावर चीनने राजनैतिक विरोध नोंदवला. भारताच्या अशा भूमिकेमुळे सीमावादाचा प्रश्न आणखी जटिल होईल असं चीनने म्हटलं आहे. चीनच्या या दाव्याची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेतली. अरुणाचल प्रदेश सैदव भारताच अविभाज्य अंग राहील असं भारताने प्रत्युत्तर दिलं आहे.