बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार गेल्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांचे सरकार सत्तेवर आले. हे सरकार आल्यापासून बांगलादेशील अल्पसंख्यांक हिंदूंवर हल्ले वाढले आहे. हिंदू व्यक्तींच्या नोकऱ्या घालवल्या जात आहेत. त्यांच्याकडून राजीनामे लिहून घेतले जात आहे. मंदिरांवर हल्ले होत आहे. तसेच पोलिसांकडून हिंदू नेत्यांवर राजद्रोहाचे खटले दाखल केले जात आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदू आता एकटवले आहेत. सुरक्षा आणि इतर मागण्यासाठी हिंदू रस्त्यावर उतरले. बांगलादेशातील 30 हजारपेक्षा जास्त हिंदूंनी एकत्र येऊन आंदोलन केले. हे निदर्शन चितगावमध्ये करण्यात आले.
हिंदू संघटनांनी म्हटले आहे की, धर्मनिरपेक्ष शेख हसीना सरकार गेल्यानंतर बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार वाढले आहेत. त्यांच्यावर हल्ले आणि छळवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून अशा हजारो केसेस हिंदूंविरुद्ध नोंदवण्यात आल्या आहेत. हिंदूंसोबत इतर अल्पसंख्याक समाजानेही विविध शहरांमध्ये सरकारविरोधी निदर्शने केली.
बांगलादेशातील शेख हसीना सरकार गेल्यापासून विविध शहरांमध्ये हिंदू संघटना सातत्याने निदर्शने करत आहेत. त्यांच्या आठ प्रमुख मागण्या आहेत. त्याला अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदा हवा आहे, स्वतंत्र मंत्रालय आणि दडपशाहीचा खटला चालवण्यासाठी न्यायिक अधिकार हवे आहेत. दुर्गापूजेसाठी पाच दिवसांची सुट्टी हवी आहे.
बांगलादेशची लोकसंख्या सुमारे 17 कोटी आहे, ज्यामध्ये हिंदू सुमारे 8 टक्के आहेत तर 91 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेने म्हटले आहे की, 4 ऑगस्टपासून हिंदूंवर 2,000 हून अधिक हल्ले झाले आहेत. हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांचे म्हणणे आहे की अंतरिम सरकारने त्यांना पुरेसे संरक्षण दिले नाही. बांगलादेशात 25 ऑक्टोबर रोजी रॅली काढण्यात आली. त्यामुळे त्या रॅलीचे प्रमुख पुजारी चंदनकुमार धर यांच्यासह 19 हिंदू नेत्यांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. याविरोधात चितगाव येथे निदर्शने करण्यात आली. या लोकांना अटक केल्यामुळे हिंदू समाज नाराज झाला आहे.