अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी काश्मीर संदर्भात एक विधान केलय. काश्मीर मुद्यावर इल्हाम अलीयेव यांनी पाकिस्तानच समर्थन केलय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाबद्दल ते बोलले. त्यांनी भारताच नाव न घेता आरोप केला की, काश्मिरींच्या अधिकाराकडे दुर्लक्ष आणि उल्लंघन होतय. अजरबैजान एक मुस्लिम देश आहे. या देशाचे भारतासोबत चांगले संबंध आहेत. पण काश्मीर मुद्यावर हा देश पाकिस्तानसोबत आहे.
अजरबैजानचे चांगले संबंध इस्रायलसोबत सुद्धा आहेत. भारत आणि इस्रायलमध्ये घट्ट मैत्री आहे. अजरबैजान आणि इस्रायलमध्ये सुद्धा तशीच मैत्री आहे. इस्रायलची अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणत अजरबैजानच्या बळावर चालते, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. अजरबैजानचे टर्की, इजिप्त, बहरीन, संयुक्त अरब अमीरात, जॉर्डन, कोसोवो, मोरक्को, अल्बानिया या मुस्लिम देशांसोबत चांगले संबंध आहेतच. पण इस्रायलसोबतही त्यांनी चांगले द्विपक्षीय, रणनीतिक आणि आर्थिक संबंध विकसित केले आहेत.
हा मुस्लिम देश स्वतंत्र कधी झाला?
18 ऑक्टोबर 1991 साली अजरबैजान स्वतंत्र झाला. डिसेंबर 1991 रोजी इस्रायलने औपचारिकपणे अजरबैजानच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. 7 एप्रिल 1992 रोजी इस्रायलने अजरबैजानसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. अजरबैजानमध्ये जवळपास 30,000 यहुदी राहतात. अजरबैजानची राजधानी बाकूमध्ये हे यहुदी राहतात. अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी इस्रायलसोबत असलेल्या संबंधांची तुलना हिमखंडाशी केली होती.
बेंजामिन नेतन्याहू यांनी कधी दौरा केलेला?
डिसेंबर 2016 मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बाकूचा दौरा केला होता. इस्रायल आणि अजरबैजानमध्ये उत्कृष्ट संबंध आणि मैत्री वाढवण्यावर त्यांनी भर दिलेला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अजरबैजानचे राष्ट्रपती अलीयेव यांनी इस्रायली राष्ट्रपतींची भेट घेतली होती.
या मुस्लिम देशाकडून इस्रायलला काय मिळतं?
इस्रायल-हमास युद्धा दरम्यान अजरबैजान मजबुतीने इस्रायलसोबत उभा राहीला. अजरबैजान तो देश आहे, जो इस्रायलला तेल देतो. इस्रायलकडून त्यांना शस्त्रास्त्र मिळतात. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूटनुसार, 2011 ते 2020 दरम्यान अजरबैजानच्या प्रमुख शस्त्रास्त्र आयातीत इस्रायलचा हिस्सा 27 टक्के होता.
युद्धाच्यावेळी इस्रायल ठामपणे या मुस्लिम देशाच्या मागे उभा राहिला
इस्रायलमधील अनेक कंपन्यांनी अजरबैजानमध्ये गुंतवणूक केली आहे. 2000 आणि 2005 दरम्यान इस्रायल अजरबैजानचा पाचवा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार देश आहे. रिपोर्ट्सनुसार, इस्रायलला 40 टक्के तेल अजरबैजानकडून मिळतं. 2020 मध्ये अजरबैजान आणि इस्रायलमध्ये व्यापार जवळपास 200 मिलियन अमेरिकी डॉलर होता. आर्मेनिया आणि अजरबैजान युद्धावेळी इस्रायलने आपली शस्त्रास्त्र आणि तांत्रिक क्षमतेने अजरबैजानची मदत केली होती. इस्रायलच्या मदतीमुळे अजरबैजानला नागोर्नो-कराबाख हे प्रांत ताब्यात घेता आले.