बांग्लादेशात प्रचंड मोठा विद्रोह झाला आहे. शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेने उठाव केला. मागच्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्यावरुन बांग्लादेशात असंतोष धुमसत होता. या सगळ्याची परिणीती अखेर शेख हसीना यांच्या राजीनाम्यात झाली आहे. परिस्थिती इतकी चिघळली की, काल तातडीने शेख हसीना यांना देश सोडावा लागला. शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील हिंडन एअर बेसवरील गेस्ट हाऊसमध्ये त्या थांबल्या आहेत. शेख हसीना यांनी बांग्लादेश सोडल्यानंतरही तिथे हिंसाचार थांबलेला नाही. वेगवेगळ्या भागात तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. बांग्लादेश क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मशरफे मुर्तजाचा घर आंदोलकांनी पेटवून दिलं.
मशरफे मुर्तजा सत्ताधारी अवामी लीग पार्टीचा खासदार होता. बांग्लादेशातील कथित नरसंहार आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक अटकेविरोधात मुर्तजाने मौन बाळगलं होतं. म्हणून आंदोलकांनी अशा प्रकारे संताप व्यक्त केला. आंदोलक मुर्तजाच्या घरी तोडफोड, जाळपोळ करत असल्याच व्हिडिओमध्ये दिसतय.
क्रिकेटच्या मैदानात मोठी कामगिरी
मुर्तजाने वेगवेगळ्या फॉर्मेट्समध्ये 117 सामन्यात बांग्लादेशच नेतृत्व केलं. आपल्या मोठ्या क्रिकेट करियरमध्ये त्याने 36 टेस्ट, 220 वनडे आणि 54 टी20 मॅचेसमध्ये शानदार प्रदर्शन केलं. 2,955 धावा केल्या. रिटायरमेंटनंतर 2018 साली राजकीय इनिंग सुरु केली. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली अवामी लीग पार्टीमध्ये सहभागी झाला. नरैलमधून खासदारकीची निवडणूक जिंकली.
मुख्य न्यायाधीशांच्या घरात लुटमार
ढाक्यात बांग्लादेशच्या मुख्य न्यायाधाशींच्या घरात आंदोलकांनी लुटमार केली. बांग्लादेशातील पोलीस व्यवस्था पूर्णपणे कोसळून गेलीय. रस्त्यावर पोलीस तैनात नाहीयत. बांग्लादेशच्या बॉर्डर गार्डच्या जवानांना परत बोलवण्यात आलं आहे. फक्त सैन्य बांग्लादेशच्या रस्त्यावर तैनात आहे. पण त्यांची संख्या कमी आहे.
‘बंगबंधु भवन’ मध्ये तोडफोड
बांग्लादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचं निवासस्थान ‘बंगबंधु भवन’ मध्ये तोडफोड करण्यात आली. तिथे जाळपोळ झाली. ढाका येथे धानमंडीमध्ये ऐतिहासिक इमारत आहे. शेख मुजीबुर रहमान यांनी त्या इमारतीचा वापर खासगी निवासस्थान म्हणून केला होता.
याच घरात बांग्लादेशच्या संस्थापकांची हत्या
1975 साली शेख मुजीबुर रहमान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची याच घरात हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सुदैवाने शेख हसीना या हल्ल्यातून वाचल्या. कारण त्यावेळी त्या परदेशात होत्या. ही इमारत एक राष्ट्रीय स्थळ आहे. या इमारतीला बंगबंधु स्मारक संग्रहालयात बदलण्यात आलय.