बांग्लादेशच्या नव्या सरकारसोबत अजून भारताचे सूर जुळलेले नाहीत. भारत सरकारने शेख हसीना यांना आश्रय दिला आहे. ही गोष्ट बांग्लादेशच्या नव्या सरकारच्या पचनी पडत नाहीय. शेख हसीना यांचे कट्टर विरोधक बांग्लादेशात बनलेल्या नव्या अंतरिम सरकारमध्ये आहेत. भारत शेख हसीना यांच्या पाठिशी उभा राहिल्याने अंतरिम सरकार भारताच्या विरोधात दिसत आहे. मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखाली हे अंतरिम सरकार भारताच्या चिंता वाढवणारे निर्णय घेत आहे. मोहम्मद यूनुस यांच्या अंतरिम सरकारने आधी हसीना यांच्या कार्यकाळात झालेल्या MoU ची समीक्षा करणार असल्याच म्हटलं. आता बांग्लादेशची पाकिस्तान सोबत जवळीक वाढत चालली आहे.
बांग्लादेशच्या अंतरिम सरकारमधील ब्रॉडकास्टिंग आणि IT मंत्री नाहिद इस्लाम यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानसोबत 1971 च्या मुक्ती संग्रामाचे जे मुद्दे आहेत, त्यावर आम्हाला तोडगा काढायचा आहे, असं नाहिद इस्लाम ढाका येथे पाकिस्तानी राजदूतासोबतच्या बैठकीनंतर बोलले. त्याआधी 30 ऑगस्टला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मोहम्मद यूनुस यांना फोन केला होता. दोन्ही देशांतील लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र मिळून काम करण्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चेत भर दिला होता.
बांग्लादेशच नवीन सरकार काय करतय?
महिन्याभरापूर्वी बांग्लादेशसाठी भारत जवळचा मित्र होता. भारतासोबत घनिष्ठ संबंध होते. पण सत्तापालट होताच बांग्लादेश चीन आणि पाकिस्तानच्या जवळ चालला आहे. हसीना सरकारच्या काळात पाकिस्तान आणि बांग्लादेशचे संबंध फार चांगले नव्हते. शेख हसीना सरकारने जमात-ए-इस्लामीच्या अनेक नेत्यांवर 1971 युद्धावरुन वॉर क्राइमचे (युद्ध गुन्हा) आरोप केले होते.
नाहिद इस्लाम कोण?
नाहिद इस्लाम हे विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व आहे. शेख हसीना सरकारविरोधात जे विद्यार्थी आंदोलनाच चेहरा राहिले, त्यात नाहिद इस्लाम आहे. तो आता अंतरिम सरकारमध्ये मंत्री आहे. अंतरिम सरकारमधील वरिष्ठ अधिकारी आणि बांग्लादेशातील पाकिस्तानी उच्चायुक्त सैयद अहमद मारूफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नाहिद इस्लामने हे वक्तव्य केलं आहे.