Bangladesh Violence : ‘भारतातून आलात, आम्हाला तुमची…’, बांग्लादेशात TV9 रिपोर्टरला आलेला थरारक अनुभव

| Updated on: Aug 13, 2024 | 9:06 AM

Bangladesh Violence : बांग्लादेशात सुरु असलेल्या हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. शेख हसीना यांना देश सोडावा लागल्यानंतर तिथे हिंदुंवर अत्याचार सुरु आहेत. बांग्लादेशात सध्या काय परिस्थिती आहे, तिथले लोक काय विचार करतायत ते टीव्ही 9 भारतवर्षने ग्राऊंड झीरोवरुन कव्हर केलय.

Bangladesh Violence : भारतातून आलात, आम्हाला तुमची..., बांग्लादेशात TV9 रिपोर्टरला आलेला थरारक अनुभव
Bangladesh Tv9 Reporter
Follow us on

तुम्ही भारतातून आलात, आम्हाला तुमची गाडी चेक करायची आहे, असं बोलत एकाचवेळी अनेक विद्यार्थी गाडीच्या दिशेने आले. एक मुलगी विद्यार्थ्यांच्या त्या गटाचं नेतृत्व करत होती. तिच्या हातात एक लाकडी काठी होती. ती काठी गाडीवर मारत बोलली की, घाबरु नका, आम्ही काही करणार नाही. ती ग्रॅज्युएशनची विद्यार्थिनी असावी. आपल्या हातातला एक छोटा दांडा गाडीवर मारला. बांग्लादेशात भारतीयांना असं ऐकाव लागेल, याचा कोणी विचार केलेला? TV9 चे पत्रकार मनीष झा यांना बांग्लादेशात ग्राऊंड रिपोर्टिंग करताना आलेला हा अनुभव आहे.

ढाकापासून 300 किलोमीटर अंतरावर मेहरपुर आणि खुलना येथे ग्राऊंड रिपोर्टिंग करुन ढाका येथे परतत असताना हा अनुभव आला. त्यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. ढाक्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर मोठा ट्रॅफिक जाम लागला होता. व्यवस्था कायम ठेवण्यासाठी कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी इथे-तिथे पळत होते. शेजारच्या लेनमध्ये सुरक्षा पथकाच्या दोन गाड्यांमधील जवान शांतपणे ट्रॅफिक सुटण्याची वाट पाहत होते. वेळ बदललीय हे त्यांच्या लक्षात आलेलं.

इतकं ऐकून ती मुलगी आणि…

सध्या विद्यार्थी बांग्लादेश चालवत आहेत. ज्यावेळी विद्यार्थ्यांनी माझ्या गाडीच्या आत डोकावलं, त्यावेळी मी हसून त्यांना म्हटलं, तुम्ही एक मोठा टप्पा गाठलाय. तुम्ही जे मिळवलय, त्याचा अभिमान आहे. तुमच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे. इतकं ऐकून ती मुलगी आणि ग्रुपमधील अन्य मुलांच्या चेहऱ्यावर चमक आली. हसून त्यांनी माझे आभार मानले. तुम्ही तुमची गाडी पुढे नेऊ शकता असा आवाज आला. थँक्यूच आदान-प्रदान झालं. ते विद्यार्थी नंतर माझ्या मागे असलेल्या गाडीचा तपास करु लागले.

लष्कर फक्त नावाला

ढाक्यामध्ये रस्ते, चौक आणि गल्लीमध्ये एकसारखी स्थिती आहे. रस्त्यावर विद्यार्थ्यांनी कमान आपल्या हाती घेतली आहे. बांग्लादेशात जागोजागी लष्कर तैनात आहे. पण ते फक्त शस्त्र घेऊन उभे आहेत. डॉक्टर युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार नीतिगत निर्णय घेत आहे. पण रस्त्यावर विद्यार्थी जागेवरच निर्णय घेत आहेत. मागच्या तीन-चार दिवसांपासून ते हे काम खूप मेहनतीने आणि जबाबदारीने करत आहेत.

‘सांगा आमची हसीना कशी आहे?’

बांग्लादेशच्या संसदेसमोर विद्यार्थ्यांच्या एका गटाशी सामना झाला. भारतीय पत्रकार आहे हे समजल्यानंतर ते पुढे आले. त्यातल्या एका मुलीने टोमणा मारला, तुम्ही दिल्लीवरुन आला आहात, सांगा आमची हसीना कशी आहे?. तिचा व्यवस्थित काळजी घेताय ना! प्रश्नातला तिरकसपणा लक्षात आल्यानंतर मी संयमाने उत्तर दिलं. आम्हाला सुद्धा त्यांचा चेहरा पहायला मिळालेला नाही. असं ऐकण्यात आलय की, त्यांना दुसरीकडे कुठेतरी जायचं होतं. पण ती व्यवस्था होईपर्यंत त्या भारतातच राहणार आहेत. मनीष झा यांना बांग्लादेशात ग्राऊंड रिपोर्टिंग करताना आलेला हा अनुभव आहे. त्यावरुन सध्या बांग्लादेशात काय स्थिती आहे? याची कल्पना येते.