वॉशिंग्टन: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैन्यांच्या दरम्यान जोरदार संघर्ष झाला. त्यानंतर दोन्ही देशाच्या सैन्यांनी माघारही घेतली. या संघर्षानंतर अमेरिकेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संघर्षानंतर भारत आणि चीनच्या सैन्यांनी तात्काळ माघार घेतली. याबद्दल बायडेन प्रशासनाने आनंद व्यक्त केल्याचं व्हाईट हाऊसने म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव काराइन जीन पियरे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भारत-चीन दरम्यानच्या संघर्षावर अमेरिका लक्ष ठेवून आहे. दोन्ही देशांनी सीमावादावर चर्चा करावी. द्विपक्षीय संवादातून दोन्ही देशांनी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे, असं मत काराइन जीन पियरे यांनी व्यक्त केलं आहे.
दोन्ही देशांच्या सैन्यांनी संघर्षानंतर तात्काळ माघार घेतली. त्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. भारत आणि चीनने द्विपक्षीय संवादातूनच या प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये शुक्रवारी भारत आणि चिनी सैन्यात संघर्ष झाला. यावेळी दोन्हीकडच्या सैनिकांना किरकोळ मारही लागला. यावेळी भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना जशास तसे उत्तर दिले. या संघर्षात चिनी सैनिक सर्वाधिक जखमी झाले.
9 डिसेंबर रोजी तवांगमध्ये यांग्त्से परिसरात वास्तविक नियंत्रण रेषेचं चिनी सैन्य उल्लंघन करत होतं. भारतीय सैन्याने अत्यंत चिवट झुंज देत चिनी सैनिकांची घुसखोरी रोखली. यावेळी दोन्ही सैन्यात संघर्ष झाला. त्यात आपला एकही जवान शहीद झाला नाही. कोणताच सैनिक गंभीर जखमीही झाला नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसंदेत स्पष्ट केलं.
आपलं सैन्य आपल्या देशांच्या सीमामंचं संरक्षण करण्यास सक्षम आहे, हे मी विश्वासाने स्पष्ट करतो. कोणत्याही हल्ल्याला आणि घुसखोरीला रोखण्यासाठी आपलं सैन्य तयार आहे. आपल्या सैन्याच्या साहस आणि धाडसाचं हे सभागृह समर्थन करेल याचा मला विश्वास आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले.