न्यूयार्क : अमेरिकेची तपास संस्था एफबीआय (FBI) चक्क राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joo biden) यांच्या निवासस्थानी छापेमारीसाठी पोहचली. रेहोबोथ येथील समुद्रकिनारी असणाऱ्या बायडेन यांच्या वडिलोपार्जित घर व इतर 2 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. अमेरिकेतील सर्वात प्रबळ नेत्याच्या घरात तब्बल तीन तास सर्च ऑपरेशन सुरु होते. गोपनीय दस्तावेज (Classified documents) घरी ठेवल्याचा आरोपामुळे ही कारवाई झाली.
एफबीआयने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या खाजगी निवासस्थानावर छापा टाकला. एफबीआयचा हा छापा गोपनीय कागदपत्रांसंदर्भात संबंधित होता. मात्र या छाप्यात कोणतीही गोपनीय कागदपत्रे सापडलेली नाहीत. बायडेन यांच्या वकिलांनी एका निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार केले. त्यांच्यांवर वैयक्तिक कार्यालयात आणि घरात गोपनीय कागदपत्रे ठेवल्याचा आरोप होता. ही कागदपत्रे 2009 ते 2016 या काळात उपराष्ट्रपती असतानाची असल्याचे सांगण्यात आले. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात मानद प्राध्यापक असताना 2017-19 पासून बिडेन यांनी हे वापरले होते असा आरोप आहे.
यापुर्वीही झाली झडती
गेल्या महिन्यातही बायडेन यांच्या घराची झडती घेण्यात आली होती. त्यावेळी 13 तासांच्या शोधानंतर सहा गोपनीय दस्तऐवज जप्त केले होते. बराक ओबामा यांच्या कार्याकाळत बायडेन उपराष्ट्राध्यक्ष असतानाची ही कागदपत्रे आहेत. सरकारी कार्यालय सोडल्यानंतर अशा कागदपत्रांना अभिलेखागाराकडे जमा करावे लागते, असा अमेरिकेतील नियम आहे.
ट्रम्प यांच्यांवर पडला होता छापा
यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील निवासस्थानातून गुप्त कागदपत्रे सापडली होती. त्यात सरकारच्या आण्विक क्षमतेचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावेळी एफबीआयने कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, छापेमारीदरम्यान ट्रम्प यांच्या घरातून 11,000 हून अधिक सरकारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये परदेशात केलेल्या टॉप सीक्रेट ऑपरेशन्सशी संबंधित अनेक कागदपत्रे होती.
काय असते गोपनीय दस्तावेज
गोपनीय दस्तावेजात संवेदनशील माहिती असते. या माहितीमुळे राष्ट्रीय सुरक्षा किंवा परकीय संबंधांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. दुसऱ्या महायुद्धापासून अमेरिकेत अशा प्रकारे गुप्त कागदपत्रे जपली जात आहेत. गोपनीय माहितीमध्ये कागदी दस्तऐवज, ईमेल, छायाचित्रे, नकाशे, प्रतिमा, डेटाबेस आणि हार्ड ड्राइव्ह समाविष्ट असू शकतो. माध्यम कोणतेही असो, पण अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते.