अंकारा | 1 ऑक्टोबर 2023 : जगाला हादरवणारी एक बातमी आहे. तुर्कस्तानच्या संसदेजवळ आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण तुर्कस्तानसह जग हादरून गेलं आहे. एका दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवून दिलं आहे. तर दुसऱ्या दहशतवाद्याला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेत त्याच्याकडील बॉम्ब निकामी केला आहे. तुर्कस्तानची संसद सुरू होण्याच्या आधीच हा हल्ला झाला. या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले आहे. तुर्कस्तान सरकारने हा दहशतवादी हल्ला असल्याचं जाहीर केलं आहे.
राजधानी अंकारा येथे तुर्कस्तानची संसद आहे. या संसदेच्या समोरच पोलीस मुख्यालय आहे. आज सकाळी 9 वाजता पोलीस मुख्यालयाच्यावरच अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ला केला आहे. दोन दहशतवादी एका गाडीतून राष्ट्रीय पोलीस मुख्यालयाच्या इमारतीजवळ पोहोचले. यातील एकाने स्वत:ला बॉम्बने उडवून दिले. तर दुसऱ्या सोबत सुरक्षा रक्षकांची चकमक सुरू होती. या चकमकीत तो मारला गेला. त्यानंतर सुरक्षा दलाने तात्काळ त्याच्याकडील बॉम्ब निकामी केला. या चकमकीत दोन पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या हल्ल्याची माहिती दिली आहे.
सुरुवातीला तुर्कीची संसद आणि मंत्रालयाच्या जवळील सरकारी इमारतीत बॉम्ब स्फोट घडवून आणल्याची बातमी होती. तसेच गृहमंत्रालयाजवळील मातीचा ढिगाराही दाखवण्यात आला होता. हा व्हिडीओ आणि बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली होती. मात्र, गृहमंत्र्यानेच सोशल मीडियावर पोस्ट करून नेमकी माहिती देशवासियांना दिली आहे.
उन्हाळी सुट्टीमुळे तुर्कीची संसद बंद होती. ही सुट्टी संपल्याने आजपासून ही संसद सुरू होणार होती. त्यापूर्वीच सकाळी हा आत्मघाती हल्ला झाल्याने सर्वच हादरून गेले आहेत. संसद भवन आणि गृहमंत्री भवनासमोरच हा हल्ला झाला आहे. त्यामुळे संसद आणि गृहमंत्री भवनाच्या आसपास सुरक्षेचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज संसदेत राष्ट्रपती एर्दोगन उद्घाटनपर भाषण करणार होते. दरम्यान, सकाळी सुरू होणारी संसद आता दुपारी 2 वाजता सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Pictures of the site of the attack published by Anadolu Agency #Turkey pic.twitter.com/dPl6a3sihx
— Michael A. Horowitz (@michaelh992) October 1, 2023
ज्या ठिकाणी आत्मघाती हल्ला झाला त्या ठिकाणी संशयित बॅगा आणि पॅकेजेस आढळून आले आहेत. बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी आलं असून ते हे बॉम्ब निकामी करण्याचं काम करत आहे. अतिरेकी हल्ल्यानंतर या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे. पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळी मेडिकलची टीम दाखल झाली आहे. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं सांगितलं जात आहे.