लंडन – इंग्लंडमध्ये सुरु झालेल्या नाराजीनाट्यात पंतप्रधान (Prime Minister)बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी राजीनामा (resignation)दिलेला आहे. गेल्या 48 तासांत देशातील 50 हून अधिक मंत्री आणि खासदारांनी राजीनामा दिला होता. पंतप्रधानांविरोधात अविश्वास एवढा वाढला होता की 36 तासांपूर्वी ज्यांना मंत्रिपद देण्यात आले होते, त्या मिशेल डोनेलन यांनीही राजीनामा दिला. बुधवारी संध्याकाळपर्यंत 17 कॅबिनेट, 12 सचिव आणि परदेशात नियुक्त केलेल्या 4 प्रतिनिधींनी राजीनामे दिले होते. या सगळ्यांनी बोरिस यांची कार्यपद्धती, लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेली पार्टी आणि काही नेत्यांचा सेक्स स्कँडलमधील सहभाग, हे नाराजीचे मुद्दे सांगितले आहेत.
जॉन्सन यांच्या कार्यपद्धतवीवर सातत्याने काही मंत्री आणि खासदार नाराजी व्यक्त करीत होते. त्याचबोरबर लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आयोजित केलेल्या पार्टीमुळेही नाराजी वाढली होती. त्यात भर म्हणून लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी खासदार क्रिस पिंचर यांना डेप्युटी चिफ व्हीपपदी नियुक्ती केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला होता.
हा वाद उफाळलेला पाहून बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी पिंचर यांचा सरकारमध्ये सामील करण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे मान्य केले होते. त्याबाबत त्यांनी माफीही मागितली होती. पंतप्रधानांनी या प्रकरणी माफी मागितल्यानंतर काही मिनिटांत दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. तिथून या नाराजीनाट्याला सुरुवात झाली.
जॉन्सन यांचे विश्वासपात्र डेप्युटी चीफ व्हीप क्रिस पिंचर ३० जून रोजी एका सेक्स स्कँडमध्ये अडकले होते. त्यांनी त्यानंतर राजीनामाही दिला होता. मात्र पक्षातील नेत्यांचा असा आरोप आहे की पिंचर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे सहा आरोप आहेत. पंतप्रधान जॉन्सन यांना याची माहिती होती, असा आरोप राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांनी केला आहे.
बुधवारी सत्तारुढ पक्षाच्या ५४ टक्के समर्थकांनी बोरिस यांनी पद सोडावे असे सांगितले. जूनमध्ये झालेल्या सर्वेत ३४ टक्के जणांना असे वाटत होते. सर्वेत सहभागी झालेल्यांपैकी ७० टक्के राजीनाम्याच्या बाजूने होते.
आता पुढील पंतप्रधान कोण याचा निर्णय २१ जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे चर्चेत आहेत. त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद होते आणि त्यांनी त्याचा त्याग केला होता. ऋषी यांची पत्नी अक्षता मूर्ती आहेत, त्याही आता सक्रिय झाल्याचे मानण्यात येते आहे. अक्षता या नारायण मूर्ती यांची कन्या आहे.