जगभरात कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लस तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये रशिया सगळ्यात आघाडीवर आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, रशियाने कोरोना व्हायरसची तिसरी लसदेखील तयार केली असल्याचा दावा केला आहे. रशियाने ऑगस्टमध्ये स्पुतनिक व्ही (Sputnik V) ची पहिली लस सुरू केली. यानंतर, 14 ऑक्टोबरला, एपिवाककोरोना (EpiVacCorona) ही दुसरी लस आली आणि आता रशियाची तिसरी लस देखील तयार आहे.
रशियाची तिसरी लस चुमाकोव्ह सेंटरमध्ये रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये तयार केली जात आहे. या लसीकरता डिसेंबर 2020 पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नोव्होसिबिर्स्क, सेंट पीटर्सबर्ग आणि किरोव्हच्या वैद्यकीय सुविधांमधील पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील चाचण्यांसाठी ही लस मंजूर झाली आहे.
पहिल्या टप्प्यात 6 ऑक्टोबरला 15 रुग्णांना कोरोनाची लस देण्यात आली आहे आणि यातून कोणतेही वाईट परिणाम दिसले नाहीत. या लसीच्या दुसऱ्या टप्प्यात 19 ऑक्टोबरपासून 285 चाचण्या सुरू करण्यात येतील. त्यामुळे डिसेंबरपर्यंत याला मंजुरी मिळू शकते.
रशियाने त्यांच्या कोणत्याही लसीच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या नाही. रशियाची पहिली लस स्पुतनिक व्ही एडिनोव्हायरसवर आधारित आहे. राष्ट्रपती पुतीन यांच्या मुलीलाही ही लस देण्यात आली आहे. सध्या ही लस 13,000 लोकांना दिली जात आहे.
रशियाची दुसरी लस एपिवाकोरोना ही कृत्रिम लस आहे आणि ती स्पुतनिक व्हीपेक्षा अधिक सुरक्षित मानली जाते. याची 100 लोकांवर चाचणी केली गेली आहे.
भारतायी डॉक्टर रेड्डी लॅब यांनी Sputnik V चं मोठ्या प्रमाणात क्लिनिकल ट्रायल सुरू केलं आहे. यासाठी त्यांनी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडून परवानगी मागितली होती पण त्यांना नकार देण्यात आला.