न्यूयॉर्क: जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेटस् आणि मेलिंडा फ्रेंच यांच्या घटस्फोटावर अखेर कायदेशीरित्या शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी ही सर्व प्रक्रिया पूर्णत्त्वाला गेली. बिल आणि मेलिंडा गेटस् यांनी 30 वर्ष एकत्र व्यतीत केल्यानंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. 3 मे रोजी या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
यापूर्वी 2019 मध्ये अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस आणि मॅकेंझी बेझोस एकमेकांपासून विभक्त झाले होते. त्यानंतर बिल गेटस् आणि मेलिंडा फ्रेंच हे घटस्फोट घेणारे दुसरे अब्जाधीश जोडपे आहे. बिल आणि मेलिंडा गेटस् यांच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर अनेक उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या.
बिल आणि मेलिंडा हे दोघेही त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून काम सुरुच ठेवणार आहेत. तसेच वैवाहिक संपत्तीची वाटणी करण्यासही दोघांनी सहमती दर्शविली आहे. मात्र, ही वाटणी नेमकी कशी होणार, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. बिल आणि मेलिंडा या दोघांची मिळून जवळपास 150 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर बिल आणि मेलिंडा यांची गेटस् फाऊंडेशनने आरोग्य क्षेत्रात अनेक चांगली कामे केली आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रमांसाठी गेल्या 20 वर्षांत तब्बल 50 अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. मलेरिया, पोलिओ निर्मुलन, बालपोषण आणि लसीकरणासाठी गेटस् फाऊंडेशनने जगातील अनेक गरीब देशांना मदत केली आहे. तसेच 2020 मध्ये गेटस् फाऊंडेशनने कोरोनाविरोधातील लढाईसाठी 1.75 अब्ज डॉलर्सची निधी देण्याची घोषणा केली होती.
संबंधित बातम्या:
PHOTO | जेव्हा बिल गेट्स म्हणाले, ‘माझ्याकडे मायक्रोसॉफ्ट होतं आणि मेलिंडाकडे बरेच बॉयफ्रेंड…’
जगातील महागडा घटस्फोट, बिल गेटस यांची 15 हजार कोटींची संपत्ती मेलिंडा गेटस यांच्या नावावर