दुबईच्या राजकुमारीने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून जाहीरपणे पतीला घटस्फोट दिला आहे. दुबईच्या शासकाची कन्या शेख महरा बिंत मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हिने ‘तलाक तलाक तलाक’ असं इन्स्टाग्रामवर लिहित पती शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी लग्न मोडलं आहे. अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच या दोघांनी लग्न केलं होतं. तर दोन महिन्यांपूर्वीच राजकुमारीने मुलीला जन्म आहे. इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये तिने पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे घटस्फोट देत असल्याचं म्हटलंय.
‘प्रिय पती, तुम्ही इतर सोबतीसह व्यस्त असल्याने मी आपला घटस्फोट जाहीर करते. मी तुम्हाला घटस्फोट देते, मी तुम्हाला घटस्फोट देते आणि मी तुम्हाला घटस्फोट देते. काळजी घ्या… तुमची पूर्व पत्नी’, असं तिने लिहिलं आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. अनेकांनी तिच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
‘जेव्हा एखाद्या सक्षम महिलेला तिचं मूल्य समजतं’, असं एकाने लिहिलंय. तर ‘तुझ्या वडिलांनी तुझं संगोपन अत्यंत योग्य पद्धतीने केलं आहे. तू एका राजाची कन्या आहेस. आयुष्यात कितीही कठीण काळ आला तरी तू मान वर करून चाल’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अत्यंत योग्य निर्णय घेतलास, तुला आमच्याकडून शुभेच्छा’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.
शेखा महरा ही संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि दुबईच्या शासकांची मुलगी आहे. तिने ब्रिटनमधील एका विद्यापिठातून आंतरराष्ट्रीय संबंध यात पदवी संपादित केली आहे. तर मोहम्मद बिन रशीद सरकारी प्रशासनातूनही तिने पदवी प्राप्त केली आहे. शेखा महराचा जन्म 26 फेब्रुवारी 1994 रोजी युएईमधील दुबईत झाला. ती 29 वर्षांची आहे. शेखाने सुरुवातीचं शिक्षण दुबईतील एका खासगी शाळेतून पूर्ण केलं. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली होती. शेखा तिच्या सामाजिक कामांसाठीही ओळखली जाते. महिला सक्षमीकरणाचा प्रचार आणि स्थानिक डिझायनर्सचं समर्थन यांमुळे ती प्रकाशझोतात होती. शेखाला घोडेस्वारीची विशेष आवड आहे. तिने अनेक घोडदौड कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे.