Trump Rally Shooting: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत हल्ला झाला. हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. दोन व्यक्ती गंभीर जखमी आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिशेने हल्लेखोराने झाडलेली गोळी 2 सेंटीमीटरनेही आत गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. हल्लेखोर घटनास्थळावर मारला गेला. घटनास्थळावरून एआर-15 सेमी ऑटोमॅटिक रायफल जप्त करण्यात आली आहे. बेथेल पार्क, पेनसिल्व्हेनिया येथील 20 वर्षीय व्यक्ती थॉमस मॅथ्यू क्रुक्स असे हल्लेखोराचे नाव आहे. यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या कमांडोने हल्लेखोराच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
टम्प ज्या ठिकाणावरुन भाषण देत होते, त्याच्या 120 मीटरवर एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्याच्या गच्चीवर हल्लेखोर जाऊन बसला. त्या ठिकाणावरुन त्याने डोनोल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ज्या ठिकाणी सभा होती, त्या ठिकाणी ओपन स्पेस होती. त्यामुळे हल्लेखोराला गोळी चालवण्यात काहीच अडचण आली नाही. तो गच्चीवरुन ट्रम्प यांना पाहू शकत होतो.
डोनाल्ड ट्रम्प ज्या ठिकाणावरुन प्रचार सभेत भाषण देत होते, त्याच्या मागे अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसची काउंटर-स्नाइपर टीम तैनात होती. हल्लेखोराने गोळी चालवताच काउंटर-स्नाइपर टीम एक्टिव झाली. या टीममधील कमांडोने जवळपासून 200 मीटर लांबवरुन कारवाई करत हल्लेखोरास गोळ्या घातल्या. ज्या बिल्डींगवर हल्लेखोराचा मृतदेह सापडला ती एजीआर इंटरनॅशनल कंपनीची आहे. या कंपनीत ग्लास आणि प्लास्टिक पॅकेजिंगचे उत्पादन होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला प्रकरणात अमेरिकची गुप्तचर संस्था फेल ठरली. या घटनेची कोणतीही माहिती गुप्तचर यंत्रणेला नव्हती. हल्ला झाल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसचे कमांडो ट्रम्प यांच्या दिशेने धावत आले आणि त्यांना सर्व बाजूंनी कव्हर केले. त्यानंतर ट्रम्प उठले आणि त्यांच्या समर्थकांकडे हात हलवताना दिसले. त्यानंतर त्यांना कारमध्ये नेण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.