इस्रायल सध्या हिजबुल्लाह आणि हमासच्या विरोधात कारवाई करत आहे. त्यातच इस्रायलचे भारतातील महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी शनिवारी सांगितले की, इस्रायल मध्य पूर्वेतील दहशतवाद आणि त्याच्या प्रॉक्सी सैन्याविरुद्ध कठोर पावले उचलत आहे. इस्रायलने अलीकडेच इराणमधील अनेक लष्करी तळांवर अचूक हल्ले केले आहेत. कोबी शोशानी यांनी स्पष्ट केले की, इस्रायली सैन्य केवळ लष्करी तळांनाच लक्ष्य करत आहे, पण त्यांचे शत्रू नागरी वस्तींना लक्ष्य करतात.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शोशानी म्हणाले की, इस्रायलसमोर सध्या सर्वात मोठे आव्हान हमासने ओलिस ठेवलेल्या लोकांना सोडवणे आहे. “आम्हाला याची चिंता आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी इस्रायलचे काही मित्र हमासशी चर्चा करत आहेत. आमच्या काही अटी आहेत, त्यापैकी एक म्हणजे हमासकडे कोणतीही लष्करी क्षमता नसावी.” ते असेही म्हणाले की इस्रायलला लेबनॉनमध्ये एक सुरक्षा क्षेत्र बनवायचे आहे ज्यातून हिजबुल्लाहने माघार घ्यावी आणि त्या देशाचे सैन्य तैनात केले जावे.
इराणवरील हल्ल्यांबाबत चर्चा करताना शोशानी म्हणाले की, त्यांचे निकाल लवकरच समोर येतील. संदेश अगदी स्पष्ट आहे – आमच्या विश्वासार्हतेशी जुगार खेळू नका. इस्त्रायल मध्य पूर्वेतील कोणत्याही भागात, जवळ किंवा दूर असले तरीही अचूक लक्ष्य करू शकते.” मध्यपूर्वेत सुरक्षा आणि शांतता राखणे हा इस्रायलचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले की, “आमच्या आणि आमच्या शत्रूंमध्ये हा फरक आहे. आम्ही केवळ लष्करी ठिकाणांन लक्ष्य केले, नागरीकांना नाही. हे ऑपरेशन अत्यंत अचूक होते आणि केवळ इराणमधील लष्करी लक्ष्यांना लक्ष्य केले गेले. आमच्या दृष्टीने, हे इराणचे प्रकरण आता संपले आहे, आणि आम्हाला आशा आहे की ते बदला घेण्याची चूक करणार नाहीत.”
शोशानी पुढे म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून इस्रायलला इराण आणि त्याच्या प्रॉक्सी सैन्याकडून दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये गाझा, हुथी बंडखोर, येमेन आणि इतर प्रॉक्सी गटांचा समावेश आहे. इस्रायलचे ध्येय स्पष्ट आहे – मध्यपूर्वेत शांतता आणि सुरक्षा राखणे.